Wednesday, April 24, 2024
Homeनगरबाळासाहेब मुरकुटे यांचीच पक्षातून हकालपट्टी करा

बाळासाहेब मुरकुटे यांचीच पक्षातून हकालपट्टी करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा भाजपामध्ये जुन्या-नव्यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचीच भाजपातून हकालपट्टी करा, अशी मागणी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेऊन हकालपट्टी केलेल्या नेवासा नगरपंचायतचे नगरसेवक रणजित सोनवणे व दिनेश व्यवहारे यांनी केली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुका भाजप पक्षांतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै 2021 मध्ये पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेऊन माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे, अनिल ताके व शहराध्यक्ष पोपटराव जिरे यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. या घटनेला 3 महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच नगरसेवक रणजित सोनवणे व दिनेश व्यवहारे यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षातून हकालपट्टी केलेले आणि निलंबित केलेल्या भाजप कार्यर्त्यांनी आम्ही भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहोत, उलट माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेच पक्षविरोधी काम करून तालुक्यातून पक्ष संपविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे नगरसेवक रणजित सोनवणे व दिनेश व्यवहारे यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या आदेशावरून पक्षातून निलंबन करण्यात आले. त्यानंतर सोनवणे व व्यवहारे यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा पक्ष तालुक्यातून हद्दपार होईल, असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविलेल्या पत्रात या नगरसेवकांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत आहोत. 2014 च्या निवडणुकीत ऐनवेळी पक्षात आलेल्या मुरकुटे यांना निवडून आण्यासाठी जिवाचे रान केले. नेवासे नगरपंचायतच्या निवडणुकीतही शर्थीचे प्रयत्न करून भाजपची सत्ता आणली. मात्र स्वार्थासाठी भाजपात आलेल्या मुरकुटे यांच्या पत्नी भेंडे गटातून काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मुरकुटे यांनी त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवले नाही. स्वतःच्या पत्नीलाही भाजपमध्ये अधिकृतरित्या ते आणू शकले नाहीत.

पक्षात त्यांनी नेहमी भाजप विरोधी पक्षासोबत व्यक्तिगत तडजोडी करत पक्षहिताला हरताळ फासला. स्वतःच्या कुटुंबाचा व नातेवाईकांचा आर्थिक फायदा करून घेतला, असे सोनवणे यांनी म्हटले आहे.

व्यवहारे यांनी, मुरकुटे यांच्या नाकर्तेपणामुळे नेवासा मतदार संघातील जागा भाजपला गमवावी लागली. मात्र निवडणुकीनंतर काही काळातच तालुक्यात पक्ष प्रायव्हेट कंपनी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ज्या व्यक्तीचे पक्ष वाढीसाठी कुठलेही योगदान नाही, त्यास तालुकाध्यक्ष करून स्वतःच्या हातचे बाहुले केले आहे. पक्षविरोधी काम केले नसतानाही दुसरा माणूस नेतृत्व करू नये, या भावनेतून माझे निलंबन करण्यात आले असून ही बाब पक्षहिताला बाधा आणणारी आहे. पक्षविरोधी कारवाई करणार्‍या मुरकुटे यांची भाजपतून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीतून भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची मागणी पत्रकात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या