Thursday, April 25, 2024
Homeनगरशिल्लक ऊस गाळप नियोजनासाठी जिल्हाधिकारी-कारखानदारांची बैठक

शिल्लक ऊस गाळप नियोजनासाठी जिल्हाधिकारी-कारखानदारांची बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ऊसाचे गाळपाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील आठवड्यात बुधवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांसोबत बैठक घेवून नियोजन करावे. राज्य सरकारने कारखान्यांना वाहतूक आणि रिकव्हरी अनुदान जाहीर केले असून यामुळे शेवटच्या शेतकर्‍यांच्या ऊसाचे गाळप झाले पाहिजे. जेणे करून शेतकरी आणि कारखाने यापैकी कोणाचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरमध्ये घेतली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी ना.आशुतोष काळे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ऊस गाळपाच्या विषय निघाल्यावर आ. कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उस शिल्लक असून गाळपाचे नियोजन करावे, अशी मागणी केली. तर आ. काळे यांनी 15 मे पर्यंत त्यांच्या कारखान्यांचे गाळप पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या कारखान्यांचा रॉ साखरेवर भर असल्याचे सांगितले. दरम्यान, पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या स्थितीबाबत विचारणा केली. जिल्ह्यात 23 पैकी तीन कारखाने बंद झाले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे बंद झालेल्या कारखान्यांनी जवळच्या भागातील शिल्लक ऊसाची तोड करावी, असे आवाहन केले. यावेळी मजूरांच्या टोळ्यांचा प्रश्न असल्याने ऊस तोडणीसाठी यंत्राची मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी यासाठी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी बैठक घेवून शिल्लक ऊसाची तोडीचा विषय मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान, जिल्हा कृषी अधिक्षक जगताप यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. खरीप हंगामासाठी आवश्यक खते, बियाणे यांची मागणी व उपलब्धता याबाबत माहिती दिली. तसेच खरीप हंगामात बाजरी ऐवजी सोयाबीन, मका पिकाचे क्षेत्र वाढत असून कांदा पिकाची विक्रमी लागवड होत माहिती माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतली. यावेळी जगताप यांनी 2 जूनपासून जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात होणार असल्याचे सांगितले. मात्र, शेतकर्‍याच्या शेतातील ऊस तुटून गेल्याशिवाय खरीप हंगामाच्या पेरण्या कशा होणार, याकडे लक्ष वेधत मुश्रीफ यांनी आधी शिल्लक ऊसाच्या तोडणीचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

नगर जिल्ह्यात रेल्वे मालधक्यांवर हमालाचा प्रश्न असून जिल्ह्यात 575 हमालाची नोंदणी झालेली असून प्रत्यक्षात कामावर 125 हमाल येतात. यामुळे खतांचा रॅक खाली करण्यास वेळ लागत असून त्याचा फटका खतांची वाहतूक एजन्सीसह रेल्वेला बसत आहे. कामगार याद्यात नोंदणीकृत हमालांपैकी दोन तृतीआंश हमाल नवीन हमालाच्या नोंदणीसाठी मागणी करत नाहीत. तो पर्यंत नव्याने हमालाची उपलब्ध करता येत नाही, असा 2009चा शासन निर्णय आहे. यामुळे हमाल संघटनाच्या प्रमुखांशी बोलून मार्ग काढा, अन्यथा शासन निर्णयात बदल करून असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.

शेतकर्‍यांना जिल्ह्यातील प्रत्येक कृषि सेवा केंद्रातील खतांचा आजच्या तारखेचा साठा कळण्यासाठी एक ब्लॉग पोस्ट तयार करण्यात आला आहे. ग्राम कृषि विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रत्येक गावाचे खरीप नियोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 261 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी राज्यात सर्वाधिक 44 प्रकल्पांना जिल्ह्यातून मंजूरी मिळाली आहे. यामध्ये जास्तीत-जास्त 2 कोटी किंवा 60 टक्के अनुदान आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 2021 पासून शेतकर्‍यांना ठिबक सिंचनासाठी राज्य शासनामार्फत अधिकचे अनुदान देण्यात येत असून अल्प भुधारक शेतकर्‍यांना 80 टक्के व बहूभुधारक शेतकर्‍यांना 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. कृषि पतपुरवठ्यामध्ये सन 21-22 मध्ये 5 हजार 775 कोटी लक्षांपैकी 5 हजार 308 कोटी म्हणजे 92 टक्के वाटप झाले आहे. 2022 खरीपासाठी 3 हजार 914 कोटी व रब्बीसाठी 2 हजार 108 कोटी असे 6 हजार 22 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्टे ठरविण्यात आले आहे, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या