Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरीच्या पूर्व भागात बैलपोळ्यावर करोनाचे सावट

राहुरीच्या पूर्व भागात बैलपोळ्यावर करोनाचे सावट

वळण |वार्ताहर| valan

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बैलपोळ्यासाठी बैल सजावटीच्या सामान खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदाही करोनाचे सावट असून शेतकरी अद्यापही उसाचे पेमेंट न मिळाल्याने हवालदिल झालेले असून सध्यातरी बैलपोळ्याच्या उत्सवावर आर्थिक सावट आहे.

- Advertisement -

भाद्रपद महिन्यामध्ये नगर जिल्ह्याच्या काही भागात बैल पोळा साजरा करतात. शेतकरी राजा बैलपोळ्याच्या सणाला बैलासाठी नवीन कासरे, शिंगर, गोंडे, गळ्यामध्ये घुंगरमाळा खरेदी करतात. बैलाच्या शिंगाला हिंगोली लावून बेगड लावतात. सकाळी आपापले बैल नदीला नेऊन बैलांना साबण लावून आंघोळ घालतात. त्यानंतर चार वाजेपर्यंत आपापले बैल सजवितात व शेतकरी राजा आपापले बैल घेऊन गावामध्ये मारुती मंदिराच्या समोर येऊन प्रदक्षिणा मारतो. त्यानंतर बैलाला घरी नेऊन बैलाची पूजा करतो.

मात्र, यंदा शेतकरी राजा करोना महामारीमुळे अडचणीत असून शेतकर्‍याच्या मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आहे. शेतकर्‍यांनी आपला ऊस कारखान्याला दिला आहे. मात्र कारखान्यांनी एकच पेमेंट केलेले आहे. कारखान्यांनी दुसरे पेमेंट करावे, अशी मागणी शेतकरी सीताराम गोसावी, वसंत कारले, सुदामराव शेळके, जालिंदर काळे, भाऊसाहेब पवार, राधेश्याम पाटील, बाबासाहेब खुळे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍यांचा सण पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍याला पैशाची नितांत गरज आहे. या भागातून वळण, मानोरी, पाथरे, मांजरी, खुडसरगाव, पिंपरी, चंडकापूर, वांजुळपोई, तिळापूर गावातून संगमनेर, प्रवरानगर, अशोक नगर, अगस्ती कारखाना, प्रसाद शुगर, डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, सोनई, कोळपेवाडी कारखाना, संजीवनी कारखाना या कारखान्यांनी ऊस नेला आहे. काही कारखान्यांनी पहिले पंधरवाडा पेमेंट 1500 ते 2500 रुपयांनी केले आहे.

मात्र दौंड शुगर कारखान्याने पहिले पेमेंट 2500 रुपये केले तर दुसरे पेमेंट 100 रुपयाप्रमाणे शेतकर्‍याच्या बँक खाती वर्ग केले आहे. या भागातून तनपुरे सहकारी साखर कारखाना 1500 रुपये, अगस्ती कारखाना 1800 रुपये, काही कारखान्यांनी 2 हजार रुपये तर काहींनी 2200 रुपये पहिले पेमेंट केले आहे. त्यानंतर दुसरे पेमेंट दौंड शुगर कारखाना वगळता एकाही कारखान्याने केले नाही.

दुसरे पेमेंट बैलपोळ्या करीता करावे, अशी मागणी सुदामराव शेळके, सुनील पारे, नानाभाऊ खुळे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या