Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआचार्य अत्रे म्हणाले होते, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा

आचार्य अत्रे म्हणाले होते, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा

काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या जळगावातील बहिणाबाईं चौधरी यांचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी सांगितले. यामुळेच निरक्षर असलेल्या कवियत्रीचे नाव शिक्षणाचे मंदिर असलेल्या विद्यापीठाला देऊन त्यांचा प्रतिभेचा गौरव केला गेला.

असा झाला महाराष्ट्राला परिचय

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचा चीजवस्तू पाहताना सोपानदेवांच्या हाती त्या हस्तलिखित लागले. या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखविल्या. त्या कविता पाहून अत्रे उद्‌गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे’. आचार्य अत्रे यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.

- Advertisement -

जळगावात झाला विवाह

जळगावापासून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या असोदे येथे बहिणाबाईंचा जन्म झाला. नागपंचमीच्या दिवशी ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी बहिणाबाईंच्या रुपाने कन्यारत्न आले. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा असा सात बहिण-भावांचा परिवार होता. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली.

कवितेची भाषा लेवा गणबोली

बहिणाबाईंच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणीसारखे कृषिजीवनातील विविध प्रसंग होते. अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सण सोहळे या विषयावर त्यांनी काव्य लिहिले. बहिणाबाई स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.बहिणाबाई लेवा सामाजातील. त्यामुळे त्यांच्या कविताही लेवा गणबोली भाषेतून आहे. अनेकांना त्या अहिराणी असल्याचा समज होतो.

कवितांचा इंग्रजी अनुवाद

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्य़ावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’, ‘अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला देखा, पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला’, ‘अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस’ अशा सोप्या आणि आशयघन कवितांतून प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे काव्यधनाचा इंग्रजी अनुवाद केला असून ‘फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ’ हा कवितांचा संग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंचे घर आता संग्रालय

शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे “लेवा गणबोली” तील ओव्या व कविता रचून गात असत. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा ( ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून ) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झाले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य यांची जपवणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे.

अनेकांच्या होतात भेटी

जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नातं जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने पहावं असं हे बहिणाबाईंचं संग्रहालय आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामकरण

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असे नामकरण ११ ऑगस्ट २०१८ पासून करण्यात आले. नामकरणाचा निर्णय मंत्रीमंडळाने मे २०१८ मध्ये घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या