Monday, April 29, 2024
Homeनगरबागेश्वर बाबाचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, शिर्डीकर संतप्त

बागेश्वर बाबाचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, शिर्डीकर संतप्त

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. एवढेच नव्हेतर त्यांनी माफी मागावी , अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, याप्रकरणी आज शिर्डीत निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

- Advertisement -

सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहणार्‍या व प्रसिद्धीच्या खटाटोपापायी टीकेचे लक्ष्य होत स्वतःला हिंदुत्ववादी राष्ट्रीय संत म्हणविणार्‍या बागेश्वर बालाजी धामचे धिरेंद्र शास्त्री याने सद्गुरूसाई बाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिर्डीसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिर्डी शहरातील युवा शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने धिरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय.

शिर्डीतील ग्रामस्थ व युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेने सुद्धा तीव्र शब्दात निषेध नोंदवत काल नगर मनमाड महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत साई नामाचा जयघोष करीत श्री साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर आरती करण्यात आली. त्यानंतर धिरेंद्र शास्त्री या भोंदू बाबा विरोधात साई मंदिर गेट क्रमांक 4 पर्यंत पायी जात हाती निषेधाचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना ग्रामस्थांनी सांगितले की खोट्या प्रसिद्धीसाठी धीरेंद्र हा तथाकथित महाराज इतर महान संताबाबत चुकीचे वक्तव्य करत असतात अश्यांना वेळीच चाप लावणे गरजेचे झाले आहे. ग्रामस्थांनी यावेळी म्हटले की, यावेळी माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, नितीन उत्तम कोते, विकास गोंदकर, अभिजीत कोते, नितीन अशोक कोते, किरण कोते आदी प्रमुखांसह इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.

यानंतर माध्यमाशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते साईभक्त नितीन उत्तमराव कोते म्हणाले की, आमचे नेतृत्व व मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबां बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या धीरेंद्र स्वामी यांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिर्डीकर ग्रामस्थ या धीरेंद्र महाराजांवर कठोर कारवाई करण्याची तसेच त्यांनी साईबाबांची माफी मागावी अशी मागणी शासन कारभारी करणार आहेत.

जगाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांनी सबका मालिक एक हा सुद्धा मंत्र दिला आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. बाबांचे आचार विचार दिलेली शिकवणूक व संदेश मानव धर्माच्या हिताचा आहे. बाबांनी आजपर्यंत केलेल्या चमत्कारांची व दिलेल्या साक्षात्कारांची अनुभूती अनेक भक्तांना आलेली आहे. त्यामुळे साईबाबा हे प्रत्येक भाविकासाठी देवच आहेत. बागेश्वर बालाजी धामचे धीरेंद्र स्वामी यांनी साईबाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा फक्त शिर्डीकरच नव्हे तर देशभरातून निषेध होत आहे.

बाबा कोण आहेत हे धीरेंद्र महाराज यांनी सांगण्याची गरज नाही, कारण शिर्डीत असो अथवा इतर ठिकाणी साईबाबांना नतमस्तक होणार्‍या प्रत्येक साई भक्ताला नागरिकाला साईबाबा काय आहेत हे समजले आहेत. फक्त प्रसिद्ध स्टंट म्हणून साधुसंत यांच्या विषयी काहीतरी बेताल वक्तव्य करायची व सामाजिक शांतता धोक्यात आणणे तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा काहींचा असणारा डाव यातून साध्य होणार नाही कारण साईबाबा प्रत्येक भाविकाला समजले असून साई भक्तांच्या हृदयात साईबाबांचे स्थान काय असावं हे कोणी तथाशित महाराजांनी सांगण्याची गरज नाही.

शिर्डीचे साईबाबा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे धीरेंद्र शास्त्री यांनी बाबांविषयी केलेले बेताल वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा देशातील साईबाबाचे भक्त त्यांच्या विरोधात लवकरच निषेध मोर्चा काढतील.

– नितीन कोते साईभक्त, शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या