Friday, April 26, 2024
Homeनाशिकबॅकलॉगचे वेळापत्रक बदलले!

बॅकलॉगचे वेळापत्रक बदलले!

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे लॉगइन, इमेल आयडी, तसेच सॉफ्टवेअरची चाचपणी करण्यासाठी सराव परीक्षा घेतली, पण तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांनी लॉगइन केले नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे आव्हान विद्यापीठासमोर उभे राहिले आहे. या गोंधळामुळे बॅकलॉगची परीक्षा आता 13 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. 12 तारखेचा पेपर 17 तारखेला होणार असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन केले आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने होणार आहे, त्यामुळे त्याचे स्वरूप कसे असेल हे जाणून घेण्यासाठी 8 ऑक्टोबरपासून सराव परीक्षा घेण्यास सुरवात केली.

पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी लॉगइन करावे, अशी विद्यापीठाची अपेक्षा होती, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पाच वेळा परीक्षा देण्याची संधीही दिली होती. पहिल्या दोन दिवसात सुमारे 1 लाख 36 हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली.

मात्र, रविवारी त्याची मुदत संपलेली असताना अद्यापही जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी लॉगइन आणि सरावही केलेला नाही. त्यामुळे बॅकलॉग विषयांची परीक्षा 12 ऐवजी 13 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लॉगइन केले नाही, अशांना सराव परीक्षा देण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा द्यावी, असे अपेक्षित होते, पण जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी ती दिलेली नाही. त्यांना आणखी एक संधी दिली आहे. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक बदलले आहे, त्यासाठीचा मेसेज मोबाईलवर केला आहे. तसेच संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या