बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाला कधीच धक्का लावला नाही – राज ठाकरे

jalgaon-digital
1 Min Read

पुणे (प्रतिनिधी) / pune – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरे तेच सांगितले, दंतकथा मांडल्या नाहीत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी बाबासाहेबांचे कौतुक केले.

राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱयावर आहेत. यादरम्यान 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली व अभीष्टचिंतन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडले आहे. त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते, की या दंतकथा आहेत. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीच दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही. त्यांच्या कोणत्याही शिवचरित्रामध्ये तुम्हाला कधीच घोरपडीचा किस्सा दिसणार नाही. दंतकथा या ऐकायला छान असतात. पण त्यांचा इतिहासाशी काही संबंध नसतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ज्यांना जातीवरून मतदान हवे आहे, त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांना स्वतः काही वाचायचे नाही. फक्त अशा गोष्टी आणि जातीभेद पसरवून आपली पोटे भरायची आहेत. त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणेच योग्य होते, असेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *