Wednesday, April 24, 2024
Homeनगरआयुष कृती समितीच्या नावाने शिखर संघटनेची स्थापना

आयुष कृती समितीच्या नावाने शिखर संघटनेची स्थापना

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी ‘निमा’ संघटनेने आवाहन केल्यानुसार आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणार्‍या

- Advertisement -

सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे. आयुष कृती समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकदिलाने काम करतील, असा देखील निर्णय बैठकीमध्ये करण्यात आला आहे.

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या राजपत्राला विरोध करण्याकरीता 11 डिसेंबर रोजी संपाचे आवाहन केले असून, या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे.

या राजपत्राचे स्वागत करण्याकरीता निमा केंद्रीय शाखेने आखलेल्या कार्यक्रमानुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणे, विविध बॅनर्स पोस्टर्स आपल्या दवाखान्यात/हॉस्पिटल्समध्ये लावणे, त्याचप्रमाणे हे राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल केंद्र शासनाचे व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अभिनंदन करणारे व पाठिंबा देणारे पत्र सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आयुष कृती समितीकडून देण्यात येईल, असा देखील आयुष कृती समितीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला आहे.

या राजपत्रामुळे गत अनेक वर्षांपासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान प्राप्त प्रशिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणार्‍या शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे व या राजपत्रामुळे ग्रामीण व शहरांमधील आर्थिक दृष्टीने कमकुवत भागात कायद्याच्या चौकटीत तीन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणार्‍या पदव्युत्तर डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाला आहे.आयुष कृती समितीने या राजपत्राचे स्वागत केले असून त्यास पाठिंबा दिला आहे.

हे राजपत्र प्रकाशित झाल्यानंतर आय. एम. ए. सारखी संघटना या बाबतीमध्ये निष्कारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून या राजपत्रामुळे देशात तुटवडा असलेल्या शल्यचिकित्सकांच्या समस्येवर मात करण्याच्या प्रक्रियेत तसेच ग्रामीण भागात शस्त्रक्रियासारख्या सेवा उपलब्ध होण्याच्या मार्गात अडसर आहे, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रामध्ये कायद्याने आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सा पद्धतीचा अधिकार प्राप्त झालेला असून त्यासंदर्भात देखील मागील काळात इंडियन मेडिकल असोसिएशनने या कायद्यास स्थगिती देण्यासंबंधी उच्च न्यायालयात मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्याकरीता स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबतीत इंडियन मेडिकल असोसिएशनची याचिका फेटाळली आहे.

ही वस्तुस्थिती असताना काहीतरी नव्याने परवानगी देण्यात आली आहे व या डॉक्टरांना कसे प्रशिक्षण मिळेल? त्यांची गुणवत्ता काय असेल? अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण करुन या राजपत्राच्या बाबतीत ‘मिक्सोपॅथी’, ‘खिचडीफिकेशन’ अशा शब्दांचा वापर करुन नागरिकांना संभ्रमित करून व शस्त्रक्रियेच्या अधिकाराच्या बाबतीत व प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे शस्त्रक्रियेच्या बाबतीत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी म्हणावा लागेल.

प्रत्येकवेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने यांचा वापर करुन सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून जो प्रयत्न सुरु आहे, तो देखील समाजहिताच्या दृष्टीने सर्वथा अनुचित आहे. यादृष्टीने सकारात्मक विचार करावा असे देखील आयुष कृती समितीचे इंडियन मेडीकल असोसिएशनला आवाहन आहे.

याप्रसंगी निमा राहुरीचे अध्यक्ष डॉ कस्तुभ मेहेत्रे, सचिव डॉ. प्रकाश पवार, उपाध्यक्ष डॉ. मंगेश कुंभकर्ण, खजिनदार डॉ. नरेंद्र इंगळे, डॉ. राजेश पेरणे, डॉ. संजय म्हसे, डॉ. भागवत वीर, डॉ.सचिन पोखरकर, डॉ. संदीप निमसे, डॉ. हर्षद चोरडिया, डॉ. संतोष उदावंत, डॉ. रवींद्र तनपुरे, डॉ. अनिल दुबे, डॉ. किशोर खेडकर, डॉ. किशोर पवार, डॉ. ए. आर. सी. सय्यद, डॉ. अभिजीत शिरसाट, डॉ. अमोल विटनोर, डॉ. चेतना कुलकर्णी, डॉ.सुवर्णा गोलेचा, डॉ. शुभदा खरे, डॉ. प्रीती वीर, डॉ. गौरी पवार यांच्यासह निमा राहुरीचे मार्गदर्शक डॉ. धनंजय मेहेत्रे व डॉ. जयंत कुलकर्णी यांनी सर्व आयुष डॉक्टरांना गुलाबी फिती बांधून पूर्णवेळ काम करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या