Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसामाजिक बांधिलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे

सामाजिक बांधिलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आपत्ती काळात प्रशासन युध्दपातळीवर करोनामुक्तीसाठी प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने खाजगी डॉक्टरांच्या सेवा शासकीय रुग्णालयांसाठी अधिग्रहित केल्या आहेत.

त्याव्दारा वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे हा प्रमुख उद्देश असून त्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा अधिग्रहित केलेल्या खाजगी डॉक्टरांसोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, यांच्यासह डॉ. टाकळकर, डॉ.व्यवहारे यांच्यासह इतर संबधीत खासगी डॉक्टर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी कोरोनामुक्तीसाठी वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यात मोठ्या संख्येने उपचार सुविधा वाढविण्यात येत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि मनपाच्या कोविड केअर सेंटरमार्फत गतीमानतेने रुग्णांना उपचार दिल्या जात असल्याचे सांगून गेल्या पाच सहा महिन्यापासून शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्‌या संख्येने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

मात्र संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयांची उपचार क्षमता अधिक वाढवावी लागणार आहे. आयसीयु,ऑक्सीजन खाटा यांच्या वाढीव प्रमाणात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने खाजगी डॉक्टरांच्या सेवा शासकीय रुग्णालयांसाठी अधिग्रहित केल्या आहे.

जेणेकरुन शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येत दाखल होत असलेल्या रुग्णांना वाढीव प्रमाणात योग्य उपचार तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होईल. प्रशासनाच्या या सर्व प्रयत्नांना अतिरिक्त मनुष्य बळाची गरज असून सेवा अधिग्रहणाच्या आदेशानुसार सर्व संबंधित डॉक्टरांनी तातडीने आपल्या ज्ञानाचा उपयोग रुग्णांना बरे करण्यासाठी करुन आपले कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले .

तसेच डॉ. येळीकर, डॉ. कुलकर्णी , डॉ. पाडळकर यांनी संबंधित डॉक्टरांसोबत चर्चा करुन शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी डॉक्टरांचे पथक नियुक्त करुन त्याबाबत अहवाल सादर करावा. सेवा अधिग्रहित केलेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने नियुक्त ठिकाणी रुग्णांना उपचार सेवा देण्यास सुरुवात करावी .

जेणेकरुन प्रशासनाला कुठल्याही प्रकारची पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी निर्देशीत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या