Friday, April 26, 2024
Homeनगरऔरंगाबाद खंडपीठाकडून बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद खंडपीठाकडून बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी बाळ बोठे याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी गुरूवारी नामंजूर केला आहे.

- Advertisement -

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर, 2020 रोजी अहमदनगर- पुणे महामार्गावर जातेगाव (ता. पारनेर) घाटात हत्या झाली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. बोठे याने अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.

सरकारतर्फे सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. तर मूळ फिर्यादीच्यावतीने वकील नारायण नरवडे आणि वकील सचिन पटेकर यांनी जामीन देण्यास विरोध दर्शविला. बोठे याने या हत्याकांडात रेखा जरे यांच्या लोकेशन (ठिकाण) माहिती घेऊन मारेकर्‍यांना दिले. दोषारोपपत्रामध्ये या बाबी आल्या आहेत. हत्याकांडास तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. बोठे याच्यावर यापूर्वी दाखल असलेले विविध गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून नियमित जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या