माध्यमांमधील चुकीचे वृत्तांकन न्यायालयाचा अवमानच

नवी दिल्ली –

न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमे ज्या प्रकारचे वृत्तांकन करीत आहेत, तो

न्यायालयाचा अवमानच ठरत आहे, असे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अशा वृत्तांकनाची काही कात्रणे आणि व्हिडीओ सादर केले.

वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरोधात दाखल 2009 च्या मानहानी खटल्यात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी न्या. ए. एम. खानविलकर यांच्या न्यायासनाने वेणुगोपाल यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. भूषण व तेजपाल प्रकरणातील काही गंभीर मुद्यांवर विचार करण्यासाठी न्यायालयाने वेणुगोपाल यांना काही अवधी दिला होता.

आज झालेल्या आभासी सुनावणीत वेणुगोपाल म्हणाले की, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या प्रलंबित प्रकरणांमध्ये न्यायालयाचा अवमान होईल, अशाच प्रकारचे वृत्तांकन करीत आहेत. या माध्यमातून ते न्यायालयावर आपला प्रभाव टाकत आहेत. आज जेव्हा मोठ्या आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये जामीन अर्ज सुनावणीसाठी येतात, तेव्हा वृत्तवाहिन्या ज्या प्रकारचे वृत्त देतात, त्यातून आरोपींचे चरित्रहनन होत असते. यावेळी त्यांनी राफेल प्रकरणाचा संदर्भ दिला. यात माध्यमांनी ज्या प्रकारे विचार मांडले आणि चर्चा घडवून आणल्या, तो सर्व प्रकार चिंताजनक आहे. असे घडायलाच नको होते.

या मुद्यावर माझी भूषण यांचे वकील राजीव धवन यांच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले. न्या. भूषण गवई आणि न्या. कृष्णमुरारी यांचाही समावेश असलेल्या न्यायासनाने वेणुगोपाल यांचे मत विचारात घेतले आणि तुम्ही या प्रकरणी काही महत्त्वाच्या मुद्यांची यादी तयार करा, आम्ही त्यांची 4 नोव्हेंबरच्या सुनावणीत दखल घेऊ, असे स्पष्ट केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *