जळगाव : पोलीस ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – 

काही गुन्ह्यांमधील संशयित आरोपीने रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चक्क शनिपेठ पोलीस ठाण्यात जावून औषधाच्या 8-10 गोळ्या सेेवन केल्या. तर त्याने स्वत:च्या हातावर स्वत:च धारदार पट्टीने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणाने पोलिसांशी बराच वेळ हुज्जत घातली.
सागर महारू सपकाळे (रा.चौघुले प्लॉट, ह.मु.प्रजापतनगर) हा दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गेला. ‘गॅस सिलिंडर भरुन द्या, नाहीतर स्वत:चे डोके फोडून येथेच आत्महत्या करतो. तुमची नोकरी घालवतो,’ असा वाद या तरुणाने पोलिसांशी घातला. त्याने संताप करीत सोबत नेलेल्या औषधाच्या एकाच वेळी आठ-१० गोळ्या   सेवन केल्या. धारदार पट्टीने हातावर वार करुन स्वत:ला जखमी करुन घेतले. या वेळी पोलीस ठाण्यात रक्त सांडले. या सुमारे अर्धा तास चाललेल्या  प्रकारामुळे पोलिसांची धावपळ झाली.
शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांना मदतीसाठी बोलवले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील आदी कर्मचारी शनिपेठ पोलीस ठाण्यातील घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी उपद्रव करणार्‍या सागर सपकाळे यास ताब्यात घेतले. त्यास डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी पोलीस घेवून गेले. परंतु, त्याने उपचार न करता तेथेही गोंधळ घातला.

अगोदरही उपद्रव

त्याच्या विरुद्ध हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ नामदेव बैसाणे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील करीत आहेत.

दरम्यान, आरोपी सागर महारू सपकाळे याने या अगोदरही काही वेळा विविध ठिकाणी असाच उपद्रव करुन गोंधळ घातला होता. तर त्याच्या विरुद्ध काही गुन्हेही दाखल झालेले आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिले. पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यानंतर अखेर त्यास घरी सोडण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *