Wednesday, April 24, 2024
Homeनगरबालिकेवर अत्याचार करणार्‍या वृद्धाला शिक्षा

बालिकेवर अत्याचार करणार्‍या वृद्धाला शिक्षा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 70 वर्षीय वयोवृद्ध आरोपीला दोन वर्ष सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक महिना जादा सक्तमजुरीची शिक्षा येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांनी सुनावली आहे.

- Advertisement -

किसन गजाबा जाधव (वय 70, रा. माळेवाडी, शिबलापूर शिवार, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. 7 मार्च 2018 ला तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी जाधव याच्याविरोधात त्याच्या गावातील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास संगमनेरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

यात पिडीत बालिकेसह एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. बालिकेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. जिल्हा न्यायाधीश कदम यांनी या प्रकरणाचा निकाल देत आरोपी जाधव याला शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक आर. एम. लहामगे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक फौजदार एस. डी. सरोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. डी. डावरे, दिपक बर्डे, टि. वाय. वाघमारे, दिपाली दवंगे, सारिका डोंगरे, विनोद गंभीर, कैलास कुर्‍हाडे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या