आगीत होरपळलेल्या कुटुंबाला जगण्याचा ‘आधार’!

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

देशभरात द्वेषाच्या राजकरणाने वातावरण दूषीत झाले असतांना औरंगाबाद शहरात एक सकारात्मक आणि माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना घडली आहे. गेल्या आठवडयात काडी काडीने जमवलेला राजू आणि अश्विनी चव्हाण यांचा संसार जळून खाक झाला. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच उरले नाही. आस्था जनविकास संस्थेने दानशूरांच्या मदतीने चव्हाण यांचा संसार नव्याने उभा करत जगण्यासाठी बळ दिले.

राजू आणि अश्विनी चव्हाण सिडको एन-३ येथील कैलास (Apartment) अपार्टमेंटमध्ये वॉचमेन म्हणून काम करतात. अपार्टमेंटच्या मागे एका पत्राच्या खोलीत ते दोन मुले आणि आईसह राहतात. राजू रिक्षाही चालवतात. तर अश्विनी धुणी-भांड्याची काम करते. दोन्ही मुले शाळेत शिकतात. राजू यांना एकच किडनी असल्याने त्यांना कामातही मर्यादा पडतात. २१ एप्रिल रोजी दुपारी (Shortcircuit) शॉटसर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. काही क्षणात आगडोंब उसळून संपूर्ण घर खाक झाले. घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली. पण अंगावरील कपड्यां शिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही.

अपार्टमेंट समोर राहणाऱ्या डॉ.योगिता महाजन यांनी ही बाब आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ.आरतीश्यामल जोशी यांना सांगीतली. डॉ.जोशी यांनी समाजमाध्यमांवर मदतीचे आवाहन केले. अवघ्या तीन दिवसात कपडे, किराणा, धान्य ,भांडी, शैक्षणिक साहीत्य असे संसारोपयोगी साहित्य जमा झाले. शुक्रवार, २९ एप्रिल राेजी हे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आले. आगीत खाक झालेला संसार नव्याने उभा राहण्यास मदत झाल्याने आश्विनी यांच्या डोळ्यात अश्रू तराळले.

उपक्रमासाठी डॉ.आरतीश्यामल जोशी यांच्यासह मंजुषा माळवतकर, डॉ.योगिता महाजन, पद्मा तापडीया, आनंद भगेरीया, शशिकांत शास्त्री, शशांक तांबोळी, आरती पाटणकर, सुषमा गोटुरकर,वैशाली सदगुले, मथुरा मेवाड, विजय रणदिवे, संगीता पाटिल, अनंत काळे, संजय बरीदे, शितल रुद्रवार, रुपाली करपे, रविंद्र पाटणकर, अर्चना सोनवणे, ज्योती करमासे यांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *