विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे आ. कानडे यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

विधिमंडळाच्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये आ. लहू कानडे यांनी आपल्या मतदार संघातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधून घेत प्रभावी शैलीत मतदारसंघातील प्रश्न मांडले.

राहुरी तालुक्यातील जी 32 गावे श्रीरामपूर मतदार संघात नव्याने समाविष्ट झाली आहे. या सर्व गावांसाठी देवळाली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या प्रस्तावाला गृहखात्याने मान्यता द्यावी व नवीन पदासह नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. देवळाली परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे तसेच या परिसराचा वाढता विस्तार पाहता येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे आवश्यक आहे. देवळाली नगरपालिका असून या शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन हवे, या प्रश्नाचा त्यांनी पाठपुरावा केला.

मागील महिन्यात श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात बिबट्याचा थरार नागरिकांनी अनुभवला. बिबट्याच्या हल्ल्यात वन खात्याचा एक कर्मचारी मृत्युमुखी पडला तसेच सात ते आठ नागरिक जखमी झाले. वस्तीमधील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याची माणसे उशिरा आली त्यांचा पिंजरा वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्याचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागला. शेती महामंडळाच्या जागेत उसाची शेती असल्याने व आता उसाची कटाई चालू झाल्याने या भागातील बिबटे शहराकडे येण्यास निघाले आहेत, याकडे आ. कानडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले .

तालुक्यामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा वावर सुद्धा मोठा आहे ही बाब लक्षात घेता तालुक्यासाठी स्वतंत्र वनसंरक्षक नेमावा तसेच बिबटे पकडण्यासाठी पिंजर्‍यांची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीबाबत पूर्तता करण्याचे आश्वासन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिले.

श्रीरामपूर शहराच्या चारही दिशेने जाणारे रस्ते सध्या खूपच खराब झाले आहेत. देवळाली- पुणतांबा-कोपरगाव तसेच बाभळेश्वर-नेवासा रस्ता तातडीने होण्यासाठी या अधिवेशनामध्ये आ. कानडे यांनी प्रयत्न करावते व सदर दोन्ही रस्त्याचे काम तातडीने होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना आदेशित करून काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी मतदार संघातील जनतेने केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *