Saturday, April 27, 2024
Homeनगर...तर मंडळाच्या पदाधिकार्‍यांना तडीपार करणार

…तर मंडळाच्या पदाधिकार्‍यांना तडीपार करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा नगर शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश मंडळांची संख्याही वाढली आहे. यात अनेक ठिकाणी गणेश मंडळांच्या माध्यमातून राजकीय चढाओढ सुरू झाली आहे यातून वाद निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. उत्सव काळात शांतता भंग केल्यास, वाद घातल्यास मंडळाच्या पदाधिकार्‍यांना थेट तडीपार करण्यात येईल, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

नगर शहरात गणेश मंडळांच्या मंडप उभारणी वरूनच चार ते पाच मंडळांमध्ये वाद सुरू झाले होते. यात एका ठिकाणी पोलीस प्रशासनाने कोणताही कार्यक्रम घेण्यास, उत्सव – सण साजरा करण्यास निर्बंध घातले आहेत. इतर ठिकाणी तोडगा काढून वाद मिटवण्यात आले असले, तरी राजकीय चढाओढीतून याठिकाणी कुरबुरी सुरूच आहेत. मंगळवारी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेश स्थापना मिरवणुकीमध्ये काही ठिकाणी तुरळक वाद झाले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हे वाद मिटवले. मात्र, येत्या आठवडाभरात आणखी मोठे वाद होऊ नयेत, गणेश उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.

अपर अधीक्षक प्रशांत खैरे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी बुधवारी सायंकाळी वाद होण्याची शक्यता असलेल्या, तसेच पहिल्या दिवशी किरकोळ वाद झालेल्या, मिरवणुकीच्या माध्यमातून रस्ते अडवणार्‍या ठराविक गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा. गणेश मंडळाच्या ठिकाणी 24 तास सुरक्षेसाठी किमान एक व्यक्ती उपलब्ध असावा. उत्सव काळात कोणत्याही परिस्थितीत गैरवर्तन करू नये. वाद घालू नयेत. नागरिकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये, अशा सूचना देत, शांतता भंग होईल, असे कृत्य केल्यास मंडळाच्या पदाधिकार्‍यांना त्याच दिवशी तडीपार केले जाईल, असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या