माल मिळेल का ? अप्पर पोलीस अधीक्षक यांची ऑडिओ क्लीप व्हायरल

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर रुजू झालेले डॉ. दत्ताराम राठोड यांची एक ऑडिओ क्लीप

व्हायरल झाली असून यात ते माल मिळेल का? अशी थेट विचारणा करत असल्याचा आवाज आहे. एका पोलीस कर्मचार्‍यांशी झालेल्या त्यांच्या ‘अर्थ’ पूर्ण संभाषणामुळे ही क्लीप जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी या प्रकरणारची गंभीर दखल घेतली असून डॉ. राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यासोबतच सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. राठोड यांच्या ऑडिओ बॉम्बमुळे जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमा पुन्हा डागाळली गेली असून ‘खाकी’तील हप्तेखोरपणा स्पष्टपणे समोर आला आहे. डॉ.राठोड यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण मात्र देण्यात आलेले नाही.

मुळचे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील रहिवाशी असलेले डॉ. राठोड यांची नगरमध्ये साधारणपणे महिन्यांपूर्वी बदली झाली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना करोना संसर्गाचे निदान झाल्याने ते रजेवर होते. त्यांचा पदभार डॉ. राठोड यांच्याकडे होता. या काळात डॉ. राठोड यांनी विशेष पथकाची स्थापना करून जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात छापासत्र सुरू केले.

जिल्ह्यातील गुटखा, वाळू, जुगार याबरोबरच बेकायदेशीररित्या डिझेलची होत असलेली विक्री, बेकायदा फटक्याचा साठा यावर त्यांनी छापे टाकून लाखोचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात सुरू असलेली छापेमारी यामुळे अवैध धंद्या करणार्‍यांचे धाबे दणाणले.

डॉ. राठोड यांच्या कार्यकाळात 21 गुन्हे दाखल करत 27 आरोपींना गजाआड केले. 65 लाखाचा मुद्देमालही जप्त केला. त्यातचे त्यांचे नेवासे येथील पोलीस कर्मचारी गर्जे याच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली. त्यात थेट माल मिळेल का? की रेड टाकू असे संभाषण आहे. या क्लिपमुळेच डॉ. राठोड यांची तडकाफडकी बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे.

क्लिपमधील अनेक संवाद वादग्रस्त आहे. ते पोलीस दलाकडील अधिकार्‍यांच्या’अर्थ’ पूर्ण कार्यपद्धतीकडे लक्ष वेधतात. क्लीमध्ये झालेल्या चर्चेत पोलीस दलातील एका महिला अधिकार्‍यांच्या उल्लेख असून संबंधीत महिला अधिकार्‍यांने देखील हप्तेखोरीतून खूप काही कमविले आहे, अशी ती संभाषणाची भाषा आहे. यासह संबंधीत महिला अधिकारी यांना थेट माल सुरू असून एका कांदा कंपनीच्या मालकाला भेटाला घेवून याचे आहे. ते आपला शब्द खाली पडून देत नाही, असा देखील संवाद या क्लीपमध्ये आहे.

नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी सुरू असून त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. हा कर्मचारी पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या जवळचा आहे. यामुळे त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबीसमोर येण्याची शक्यता आहे. उत्तरेची सर्व सेंटीग लावली आहे. सर्व मी जपून ठेवले आहे. आठ वर्षांपासून मी हेच करत असून माझ्याकडे मोठे लोक आहे. त्यांना फक्त शब्द टाकण्याचा उशीर, ते आपल्यासाठी काहीपण करायला तयार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याचे हप्ते व अवैध धंद्याचे वेगळे हप्ते वरिष्ठांना सुरू असल्याचा उल्लेख कर्मचार्‍याने केले आहे. यामुळे या पोलीस कर्मचार्‍यांवर वरिष्ठ काय कारवाई होणार याकडे पोलीस दलासह जिल्ह्याचे लक्ष आहे.

ऑडिओ क्लीप संदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतरच याबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे.

– डॉ. प्रताप दिघावकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)

ऑडिओ क्लीपशी माझा संबंध नाही. याविषयी मला काहीच माहिती नाही. माझ्याविषयी हे षडयंत्र रचले असून मंत्र्यांनी बनावट ऑडिओ क्लीप तयार केली असेल. चांगले काम केले म्हणून मला त्रास दिल्याने मी मंत्री व आमदारांची तक्रार राज्याचे पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे. त्रास देणार्‍यांना मी सोडणार नाही.

– डॉ. दत्ताराम राठोड ( तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *