Friday, April 26, 2024
Homeनगरतांत्रिक मंजुरी मिळाल्यास आष्टी-पुणे डेमो रेल्वे सेवा

तांत्रिक मंजुरी मिळाल्यास आष्टी-पुणे डेमो रेल्वे सेवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर- आष्टीदरम्यानच्या दुसर्‍या डेमो रेल्व सेवाचा शुभारंभ करण्यात येत आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत बीड, परळी रेल्वे लाईनचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर परळी ते मुंबई सेवा सुरू करण्यात येईल. तसेच आष्टी ते पुणे डेमो रेल्वे सेवेसाठी तांत्रिक बाजू तपासण्याच्या सूचना रेल्वेच्या तांत्रिक विभागाला दिल्या आहेत. तांत्रिक बाजू योग्य असल्यास आष्टी ते पुणे रेल्वे सेवा सुरू करू अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

- Advertisement -

गुरूवारी नगर-आष्टी दरम्यानच्या दुसर्‍या डेमो रेल्वेसेवेच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री दानवे बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्ना संदर्भात अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी खा.डॉ. सुजय विखे, बीडच्या खा. प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आ. बबनराव पाचपुते, आ. सुरेश धस, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अभय आगरकर, भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीनंतर मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नगर-बीड ही रेल्वे सुरू व्हावी, हे दिवंगत गोपीनाथ मुंंडे यांचे स्वप्न होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील आष्टी ते नगर अशी रेल्वे सुरू करण्यात आली. मात्र, तिला 30 टक्के प्रतिसाद मिळत असला तरी आष्टीवरून येणार्‍या व्यक्तीला नगरमधून शिर्डी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबई जाता येईल. ही जमेची बाजू आहे.दुसरीकडे नगर-पुणे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी आहे. तसेच आष्टीहून-पुण्याकडे जाण्यासाठी सुद्धा रेल्वे पाहिजे.

म्हणून आता आम्ही एक नव्याने यासाठी कनेक्टिव्हिटी करता येईल का? या दृष्टिकोनातून चाचणी करत आहोत. मी आजच रेल्वेच्या अधिकार्‍यांना आष्टी-पुणे डेमो रेल्वे सेवा देता येईल का याबाबत तांत्रिक तपासणी करण्यास सांगितली आहे. अन्य रेल्वे आणि डेमो रेल्वेच्या वेगात फरक असतो. डेमो रेल्वी ही कमी वेगाने धावते. तसेच नगर ते आष्टी रेल्वेला अद्याप सिंग्नल यंत्रणा आणि गेट बसवणे बाकी आहे. यामुळे येत्या 2023 अखेर हे काम पूर्ण करण्यासोबतच परळी, बीडपर्यंत रेल्वे लाईनचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर खर्‍याअर्थाने बीड- मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे.

सध्या नगर-मनमाड रेल्वे लाईनचे दुहेरी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण मध्यंतरी नागरिकांनी त्याबाबत ओरड केल्यामुळे हे काम थांबले होते. पण आता या कामाला गती दिली जाईल. हे दुहेरीकरण करताना अनेक ठिकाणी चार्‍या बुजवण्यात आलेल्या आहे. या समस्या नुसत्या तुमच्या नाहीत तर अख्या देशभर आहेत. त्या संदर्भात सुद्धा आता धोरणात्मक निर्णय काही घेता येईल का? याचा विचार सुरू असल्याचे दानवे म्हणाले. माल वाहतुकी सोबतच रेल्वेच्या धक्यावरून शेतीमालाची ही वाहतूक केली जाते. शेतीमालाच्या वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याचा अग्रक्रमाने धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. बेलवंडी या ठिकाणी जी काही कामे प्रलंबित आहे, ती मार्गी लावावी. तर याच ठिकाणी रेल्वे करता एक नवीन पूल देण्यात यावा, अशी मागणी आ. बबनराव पाचपुते यांनी केली आहे. त्यावर ही विचार केला जाइल असे ते म्हणाले.

शेतीमालासाठी स्वतंत्र धक्का द्यावा – खा. विखे

खा. डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्याला नगर-पुणे रेल्वेची अत्यंत गरज असून ही मागणी अगोदर केलेली आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांसाठी शेतीमाल हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या शेतीमालाला ने-आण करण्याकरिता नव्याने रेल्वे धक्का द्यावा. पण विळद या ठिकाणी जी जागा निश्चित केलेली आहे. त्या ठिकाणी मालवाहतूक करावी, अशी मागणी केलेली आहे. त्याचाही विचार करावा असेही ते म्हणाले.

पाण्याच्या चार्‍याबाबत निर्णय घ्यावा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पिक घेतले जाते. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वेच्या नवीन रॅकची अत्यंत गरज आहे, ती सुद्धा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकर्‍यांचा कांदा हा वाया जाणार नाही. तसेच रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेला अनेक परवानगी शेतकर्‍यांना घ्यावे लागतात. हेलपाटे मारावे लागतात. त्याची पद्धत सुद्धा बदलावी. आता रेल्वेने अनेक ठिकाणी पाण्याच्या चार्‍या बंद केल्या आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्या चार्‍या मोकळ्या करून द्याव्यात, अशी मागणी खा. विखे यांनी केली.

साई एक्सप्रेस पुन्हा सुरू करा

जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रशासंदर्भामध्ये आलेल्या नागरिकांनी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडून बंद पडलेली साई एक्सप्रेस शिर्डी ते मुंबई पुन्हा सुरू करावी. तसेच नगर कोपरगाव या दुहेरी मार्गाला तात्काळ गती द्यावी, अशी मागण सचिन पारखी अनिल सबलोक यांनी केली. तर शरद नवले यांनी कांदा चाळीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

कामाची अडवणूक बंद करा : दानवे

नॅशनल हायवे ज्या ठिकाणी काम करत आहे. त्या ठिकाणी आम्हाला मोकळी जागा असतांना देखील रेल्वे आम्हाला परवानगी देत नाही. आडकाठी करते, अशी जाहीर तक्रार नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांनी मंत्री दानवे यांच्यासमोर मांडल्यानंतर दानवे यांनी थेट अधिकार्‍यांना धारेवर धरत, असे प्रकार योग्य नाही. ते काही जागा काही कायम स्वरूपी थोडी घेतात. त्यांना काम करू द्या, अशी अडवणूक बंद करा, अशी तंबी सुद्धा त्यांनी अधिकार्‍यांना दिली.

2009 ते 2014 या काळात महाराष्ट्रासाठी रेल्वेची फक्त अकराशे कोटींची बजेट तरतूद होती, पण 2014 नंतर आता तब्बल दहापट जास्त म्हणजे 11 हजार कोटींची तरतूद महाराष्ट्रासाठी आहे व तरीही विरोधक आमच्या तोंडाला पाने पुसली म्हणतात, हे दुर्दैव आहे, दौंड-मनमाड दुहेरीकरण व विद्युतीकरणासह महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रकल्प आता मार्गी लागतील, असा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता दानवे म्हणाले, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान माहीत नाही, अशांनी त्यावर बोलू नये, हे आमचे मत आहे. त्यांनी कोणत्याच प्रकारची टिप्पणी सुद्धा करू नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली तेव्हा जर त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर त्यांना शिक्षा झाली पण नसती. त्यामुळे उगाच काही बोलून बोलू नये, असे ते म्हणाले. स्व. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी त्यांना मानणारे सर्वच जण जातात. त्याप्रमाणे यावर्षी स्मृतिदिनी अनेक जण स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी गेले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील स्मृतीस्थळी अभिवादनासाठी गेले होते. मात्र त्यानंतर काहीजणांनी या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणाचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब हे एकाचे नाहीत. मात्र, काही स्व. ठाकरे यांच्या संपत्तीचे वारस असतील दुसरीकडे शिवसेना प्रमुखांचे विचार सुद्धा हे महत्त्वाचे आहे. त्या विचाराचे वारसदार कुणीही होऊ शकतो, असे सांगत शिवसेना प्रमुखांना ज्या काँग्रेसने शिव्या, शाप दिले. त्याच पक्षांच्या बरोबर शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराशी प्रतारणा करीत युती करणारे जे कोणी आहेत. त्यांच्यावरच खर्‍या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे, अशी टीका दानवे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या