Friday, April 26, 2024
Homeनगरभाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु

संगमनेर | प्रतिनिधी

शेळ्या-मेंढ्यांसारखे आमदार विकले जावू लागले तर लोकशाही कशी टिकेल? हा देश एकता व संविधानावर टिकून आहे. मात्र या देशाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू राष्ट्र करण्याच्या भूमिकेवर असलेले भाजप सरकार देशाचे तुकडे करु पाहत आहे. एकता, संविधान ही आमची ताकद आहे. 75 वर्षाची सदृढ लोकशाहीचा आता गळा आवळला जात आहे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर याविरोधात पेटून उठले पाहिजे, असे आवाहन राजस्थान सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

- Advertisement -

संगमनेर येथे स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गेहलोत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगनराव भुजबळ होते. व्यासपीठावर राजस्थान राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोटासारा, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहु कानडे, माजी आमदार दिलीपराव देशमुख, उल्हासदादा पवार, अनिलदादा आहेर, त्रिंबकराव भिसे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. सुधीर भोंगळे, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, सज्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, हेमलताताई पाटील, प्रतापराव शेळके आदि मान्यवर उपस्थित होते.

नामदार गेहलोत म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. हे बलिदान आपण कसे विसरु शकतो. आज देश कुठल्या दिशेला चालला आहे. धर्माच्या नावावर देश चालणार नाही तर एकतेवर, संविधानावर देश चालेल. काँग्रेस हा पक्ष गावोगावी पोहचलेला आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला निश्‍चितच चांगले दिवस येतील. महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान कसरता येणार नाही. इतिहास मिटू पाहणार्‍यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, आणि विद्यमान भारतातील जनतेने, तरुणांनी देखील इतिहास लक्षात घ्यावा. काँग्रेसने 75 वर्षात देशाला अखंड ठेवले. तोडण्याचा विचार केला नाही. मात्र आता तोच विचार धर्माच्या नावावर केला जात आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.

एक विचार घेवून सुरु केलेली ही यात्रा एकात्मतेचे, समतेचे प्रतिक आहे. मात्र लोकशाहीवर अविश्‍वास दाखवणार्‍या भाजप सरकारने जे काही तोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे, ते योग्य नाही. यामुळे देशाचेच नुकसान होणार आहे. उद्योगपती, व्यापारी, राजकारणी यांना ‘ईडी’ची भीती दाखविली जात आहे. त्यांची सत्ता असतांनाही घोटाळे होत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महागाई, बेरोजगारी या प्रश्‍नावर हे सरकार बोलत नाही. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमीने चांगले नेते दिले आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान हे या महाराष्ट्राची शान वाढवत आहे. सहकाराची ज्योत याच महाराष्ट्रात पेटली. आणि अखंड भारतात सहकाराचे जाळे निर्माण झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या