Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआशापीर यात्रोत्सव रद्द

आशापीर यात्रोत्सव रद्द

सिन्नर |प्रतिनिधी

हिंदू -मुस्लिम धर्मियांचे श्रध्दास्थान असणाऱ्या घोटेवाडी येथील आशापुर (अश्विनाथ) देवस्थानचा वार्षिक श्रावण यात्रोत्सव यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रावणातल्या तिसऱ्या गुरुवारी या यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. करोनामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असल्याने यात्रेसाठी कुणाही भाविकाने गडावर येऊ नये असे आदेश संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेले आशापीर देवस्थान संगमनेर तालुक्यातील पारेगावमध्ये मोडते. घोटेवाडी, निऱ्हाळे, निमोण, पारेगाव, चिंचोली गुरव या परिसरातील भाविकांसोबत राज्याच्या विविध भागातून हिंदू-मुस्लिम बांधव वर्षभर या देवस्थानी दर्शनासाठी येत असतात.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देवालये बंद ठेवण्यात आली असून यात्रा-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्यामुळे येत्या गुरुवारी (दि. 6) भरणारा आशापीर बाबांचा यात्रोत्सवदेखील रद्द करण्यात आला असल्याचे तहसीलदार निकम यांनी पत्रकान्वये कळविले आहे. पारेगाव येथील यात्रा उत्सव समिती तसेच आशापीर देवस्थान ट्रस्टींना यात्रोत्सव न भरवण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

शासनाचे आदेश डावलून गडावर दर्शनासाठी गर्दी झाल्यास यात्रा समिती तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या यात्रा उत्सवासाठी दरवर्षी राज्य परिवहन महामंडळाकडून वावी व निमोण येथून बसेसची व्यवस्था करण्यात येते. वावीच्या बाजूने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी सर्वाधिक असते.

श्रावण मासानिमित्त व यात्रेसाठी गडावर गर्दी होऊ नये यासाठी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे यांनी वावी-घोटेवाडी मार्गावर सतर्क राहण्याच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या