Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट । जाहली सोपी पंढरीची वाट ।।

विठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट । जाहली सोपी पंढरीची वाट ।।

पुणे | प्रतिनिधी

दिंडय़ादिंडय़ातून होणारा विठुनामाचा घोष…अन् टाळ-मृदंगाचा झंकार…….अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने विठुनामाच्या बळावर दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे बुधवारी लीलया पार केली…आणि सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये मुक्कामाकरिता विसावली.

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच पुणेकरांनी पालखीला निरोप दिला. हडपसर येथे दोन्ही पालख्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा व तुकोबांच्या पादुकांवर माथा टेकवत भाविकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला.

रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. माउलींचा पालखी सोहळा निनादात व हरिनामाच्या गजरात अन हातात भगवे झेंडे घेत दिवेघाटाच्या दिशेने निघाला. वडकी येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. तेथे ग्रामस्थांतर्फे पालखीचे भक्तिभावात स्वागत झाले.

त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. तोवर दिवे घाट जणू माउलींच्या स्वागतासाठीच सज्ज झालेला. दिवेघाटाचा टप्पा पार करताना वारकऱयांच्या अंगात बळ संचारले. दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवांच्या मेळय़ाने घाटात प्रवेश केला. माउलींची पालखी थाटात दिवेघाटातून मार्गक्रमण करू लागली. तसा विठुनामाचा गजर टीपेला पोहोचला. रथ दौडू लागला. पालखीसवे वारकरीही धावू लागले, डोलू लागले. टाळ-मृदंगाचा, अभंगाचा निनाद डोंगरकपाऱयात घुमला. अवघा दिवे घाट विठुभक्तीत भिजून गेला.

दिवेघाटाच्या परिसस्पर्शाने आत्मिक बळ प्राप्त झालेल्या वारकऱयांनी घाटाची ही अवघड चढण सहजगत्या पार केली. पाचला पालखी घाटमाथ्यावर पोहोचली. दिवे घाटात माऊलींच्या पालखीचे दृश्य टिपण्यासाठी मोबाईलचे कॅमेरे सरसावले. सगळ्यांनाच हा अनुपम सोहळा आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचा होता. घाटाच्या दोन्ही बाजूला हा क्षण टिपण्यासाठी सासवडकरांनी एकच गर्दी केली होती.

माऊलींच्या पालखीत तरुण वारकरी मोठ्या प्रमाणावर होते. थकवा जाण्यासाठी वारकरी नाचू कीर्तनाच्या रंगी हा भाव मनी बाळगत नाचत गात, कीर्तन करत होते. माऊलींच्या टोपीने लक्ष वेधले माऊली लिहिलेली गांधी टोपी बऱ्याच वारकऱ्यांनि घातली होती. त्या टोपायाकडे सासावडकरांचे लक्ष वेधले.

तुकोबांची पालखी ‘लोणीत सायंकाळी माउलींची पालखी संत सोपान महाराजांच्या सासवडनगरीत विसावली. तेथे सासवडकरांनी पालखीचे भक्तिभावात स्वागत केले. सासवडकरांनी हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या