Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरआषाढ वद्य एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नेवाशात अधिकार्‍यांकडून वाहनतळांची पाहणी

आषाढ वद्य एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नेवाशात अधिकार्‍यांकडून वाहनतळांची पाहणी

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा येथे येत्या रविवारी होणार्‍या आषाढ वद्य कामिका एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अधिकार्‍यांनी वाहनतळाच्या ठिकठिकाणी जाऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाहणी करुन त्यादृष्टीने नियोजन केले.

- Advertisement -

ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढ वद्य वारीच्या निमित्ताने पाच लाखावर भाविक नेवासा शहरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ यांनी पार्किंगच्या ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यात आला.

पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

नेवासा फाट्याकडून येणार्‍या दुचाकी वाहनांसाठी पार्किंग जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व सेव्हन्थ डे इंग्लिश स्कूल बसस्थानक जवळ व्यवस्था करण्यात आली तर नेवासा फाटा व खडका फाट्याकडून येणार्‍या चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आवार व नामदेवनगर (कृष्णा हॉटेल समोर) येथे करण्यात आली आहे.

श्रीरामपूरकडून येणार्‍या वाहनांची पार्किंग व्यवस्था नेवासा बुद्रुकच्या श्री विश्वेवर नाथबाबा विद्यालयात करण्यात आली आहे. खुपटी, निंभारी, पानेगाव, मांजरी, उस्थळ दुमाला या रस्त्याकडून येणारी वाहनांची पार्किंग जामदार मळा (ईदगाह जवळ) येथे करण्यात आली आहे.

अशा पद्धतीने विविध ठिकाणी पार्किंग करण्यात आली असून भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहनांचा अडथळा होणार नाही यासाठी मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कोणीही रस्त्यांवर या दिवशी वाहने लावणार नाही यादृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी. यासाठी चौकाचौकांत बंदोबस्त दिला जाईल. बेशिस्त वाहनांवर कारवाई देखील करण्यात येईल. आपली वाहने पार्किंगमध्येच लावावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले आहे.

फक्त संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणार्‍या दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे येणार्‍या भाविकांनी वाहतूक कोंडी व गाडी सुरक्षित राहील या दोन्ही दृष्टीने आपली वाहने सदरील पार्किंग ठिकाणीच लावावी जेणेकरून यात्रा सुरळीत पार पडेल.

– शिवाजी महाराज देशमुख, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान नेवासा

शहरातील व्यावसायिकांनी आपली वाहने व दुकानातील सामान यात्रेच्या दिवशी दुकानांसमोर रस्त्यावर लावू नये याची दक्षता घ्यावी जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही.

-विजय करे पोलीस निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या