Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअरुण गद्रे यांचे रावतांना समोरासमोर चर्चेचे आव्हान

अरुण गद्रे यांचे रावतांना समोरासमोर चर्चेचे आव्हान

पुणे |प्रतिनिधी| Pune

कोणत्याही वैज्ञानिक पुस्तकाचा प्रतिवाद हा त्यातल्या प्रत्येक पुराव्याचे खंडण करून करायचा असतो. पुरस्कार परत घ्या, लेखकाच्या धार्मिक जिव्हाळ्याकडे बघा, अशी प्रदीप रावत यांची विरोधाची पद्धत ही केवळ एक त्यांची भावनिक प्रतिक्रिया आहे, हा शास्त्रीय प्रतिवाद नाही, असे उत्तर  ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या पुस्तकाचे लेखक अरुण गद्रे यांनी दिले आहे. दरम्यान, या पुस्तकावर समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हानही गद्रे यांनी रावत यांना दिले आहे. 

- Advertisement -

 भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व भाजपाचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी गद्रे यांच्या ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या पुस्तकास आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गद्रे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, माझ्या उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा या पुस्तकास राज्य शासनाचा महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार मिळाला आहे, तो शासनाने परत घ्यावा यासाठी माननीय प्रदीप रावत यांनी शासनाला जे पत्र दिले आहे, ते माझ्या वाचनात आले.

उत्क्रांतीच्या विरुद्ध आणि निर्मिकाच्या बाजूने वैज्ञानिक पुरावे समोर जसे येऊ लागले, हा मुद्दा अत्यंत हिरीरीने लढला जाणार हे मला मी स्वत: एक कट्टर नास्तिक होतो, त्यामुळे अपेक्षितच होते. त्यामुळे प्रदीप रावत यांची तीव्र प्रतिक्रिया मी समजू शकतो. त्यांचे असे प्रतिपादन आहे, की मी ख्रिस्तावरच्या श्रद्धेपोटी लिहिलेल्या पुस्तकाला विज्ञानविषयक पुस्तक  म्हणून लादत आहे. स्वामी विवेकानंदांना डोंगरावरच्या दहा आज्ञा देणार्‍या ख्रिस्ताबद्दल जसे प्रेम वाटते, तसे मी या ख्रिस्तावर प्रेम करतो. मी रूढ अर्थाने ख्रिस्ती धर्मीय नाही. 

माझ्या मते प्रदीप रावत अशी काही तरी विज्ञानबाह्य धार्मिक मांडणी करतात ही त्यांची मूलभूत चूक होते आहे. विज्ञान अधार्मिक असते. शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी वैज्ञानिक विषयाचा अभ्यास करताना फक्त एकच निकष लावतात. हातात कोणते वैज्ञानिक पुरावे आहेत? ते ही आज. उद्या परिस्थिती वेगळी असू शकते. म्हणून विज्ञानात पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावे लागतात. उत्क्रांती संबंधानेसुद्धा. सिद्ध झालेल्या उत्क्रांतीबद्दल प्रश्न निर्माण कसे करता बुवा? असा भाबडेपणा विज्ञानात नसतो. माझे पुस्तक फक्त पुराव्याने काय दिसते तेव्हढेच दाखवते. परमेश्वर आहे की नाही याचा परामर्श घेत नाही. हा वाद बाजूला ठेवून वाचकाना माझे आवाहन आहे, की या अद्भूत पुराव्यांची सफर तरी त्यांनी हे माझे पुस्तक वाचून करावी, असे आवाहन ते करतात. 

संपूर्णपणे वैज्ञानिक पुरावे अन फक्त वैज्ञानिक पुरावे असे हे पुस्तक पुढे जाते. 84 स्पष्ट आधार (रेफरंस) मी दिले आहेत. ते ही दिग्गज शास्त्रज्ञांचे.  हे शास्त्रज्ञ उत्क्रांतीबद्दल साशंक झाले आहेत ते प्रदीप रावत म्हणतात तसे केवळ कट्टर ख्रिस्ती धार्मिक आहेत म्हणून? प्रदीप रावत यांना हे कसे कळले, की हे सर्व तसे आहेत? मूलभूत प्रश्न असा आहे, की शास्त्रज्ञांचा धर्म कुणी अन का शोधावा?  पुस्तकातील उत्क्रांतीविरोध हा ख्रिस्चन धर्माशी जोडून प्रदीप रावत गंभीर चूक करत आहेत. माझे हे पुस्तक एक निष्ठूर वैज्ञानिक पुस्तक आहे. त्याने उत्क्रांतीच्या प्रदीप रावतांसारख्या प्रामाणिक अभ्यासू समर्थकाना जोरदार धक्का बसला तर मी समजून घेऊ शकतो, असेही ते म्हणतात. 

मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच, हा असा धाडशी विषय छापण्याबद्दल प्रकाशक आणि पुरस्कार देणारे परीक्षक यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जरी प्रदीप रावत यांच्या मागणीला यश मिळाले, पुरस्कार मागे घेतला गेला तरी माझ्या पुस्तकात दिलेल्या प्रत्येक पानावरच्या पुराव्यांना समोर ठेवत चर्चा झाल्या, तर दहा वर्ष संशोधन करून लिहिलेल्या या पुस्तकाला खरा पुरस्कार मिळाला, असे होईल.

प्रदीप रावत यांनी चुकीच्या पायावर का होईना; एक चांगली सुरुवात केली आहे, ती या पुस्तकाच्या चर्चेची! आणि प्रदीप रावत यांच्याशी किंवा इतरांशी मी समोरासमोर वाद घालण्यासाठी कधीही तयार आहे. नव्हे मला माझे कोणते पुरावे चुकीचे आहेत ते समजून घ्यायला आवडेल. कारण परत तेच. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे पुरावे जिथे बोट दाखवतात तिथे जाणे, मग आपल्याला आवडो वा न आवडो, असेही गद्रे यांनी म्हटले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या