Saturday, April 27, 2024
Homeनाशिककांद्याबरोबरच गहू बियाणांची कृत्रिम टंचाई

कांद्याबरोबरच गहू बियाणांची कृत्रिम टंचाई

निफाड | Niphad
यंदा कांद्याच्या बियाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांना अवाच्या सव्वा महाग विकली गेली. तोच प्रकार आता गव्हाच्या बियाणात सुरू झाला आहे.

अनेक दुकानदार बियाणे उपलब्ध नाही पण हवे असल्यास प्रिंट किमती पेक्षा 200 ते 300 रुपये जास्त दिल्यास मिळेल असे सांगून शेतकर्‍याकडून मोठया प्रमाणात वसुली सुरू आहे. शेतकरी विरोध करत नाही कारण जो विरोध करतो त्याला बियाणे मिळत नाही.

- Advertisement -

त्यामुळे शेतकरी निमूटपणे वाढीव दराने बियाणे खरेदी करत आहे. कृषि विभागाला कळवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. लेखी तक्रार द्या मग कारवाई करू अशी उत्तरे मिळत आहे. हतबल झालेल्या शेतकर्‍यांना पर्याय नाही त्यामुळे तो आर्थिक बोजा शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

रब्बी हंगामातील प्रमुख पीक असणार्‍या गव्हाला यंदा अनुकूल वातावरणात आहे. कांद्याची रोपे वाया गेल्याने गव्हाच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. गव्हाच्या ठराविक बियाणाला चांगली मागणी असल्यामुळे ते बियाणे संपले आहे, मिळत नाही असे वातावरण दुकानदार यांच्याकडून तयार केले जात आहे.

अजित गव्हाच्या वाणाला चांगली मागणी असल्यामुळे त्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. पण ज्यांना हवं आहे त्यांना 200 रु. वीस किलो मागे जास्त दिल्यास ते मिळते. जे दुकानदार अगोदर देत नाही तेच दुकानदार देतात असा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे.

बियाणाच्या गोणीवर 2400 रु. इतकी किंमत आहे. शेतकर्‍यांकडून मात्र 2600 रु. घेतले जातात. पिंपळस येथील दर्शन केंगे या शेतकर्‍याने निफाड येथून बियाणे खरेदी करतांना 200 रु. जास्त दिले नंतर घरी आल्यावर त्या दुकानदाराला फोन केला तर त्यांनी उपलब्ध नाही तुमच्यासाठी उपलब्ध केले वर अधिकारी आणि डीलर यांना पैसे द्यावे लागतात असे फोनवर बोलले.

याबद्दल केंगे यांनी कृषी अधिकारी बी.जी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कारवाई करू, चौकशी करू असे उत्तर देतात. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे.

अधिकार्‍यांनी कारवाई करावी
अजित 102 गव्हाच्या बियाणासाठी किंमतीपेक्षा 200 रु. माझ्याकडून निफाड येथील दुकानात घेतले. विचारणा केली तर त्यांनी डीलर आणि सिस्टीम यांना द्यायचे असल्याचे सांगितले.

कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी तालुक्यात किती आणि कुठे कुठे बियाणे आले याची माहिती घेऊन कारवाई करू असं धातुरमातूर उत्तर दिले. अशी शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी अधिकार्‍यांनी योग्य पावले उचलून कारवाई करावी.
– दर्शन केंगे, शेतकरी (पिंपळस)

- Advertisment -

ताज्या बातम्या