Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedवेध गणेश आगमनाचे...

वेध गणेश आगमनाचे…

रुपात विशालता, वृत्तीत व्यापकता, संचारात सहजता, बुद्धीत कुशाग्रता, नजरेत स्नेहार्द्रता आणि मुखावर परम भावुकता असणार्या गणेशाचं सहर्ष स्वागत करताना मनात वेगळीच प्रसन्नता असते. आबालवृद्धांना आपलंसं करणार्‍या गजाननाच्या आगमनाने निर्माण होणारं चैतन्य तनामनाला जाणवतं. म्हणूनच त्याचं पूजन करण्याचा उत्सव महोत्सव होतो. सध्या आपण या महोत्सवाच्या सज्जतेत आहोत. गणेश विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे.

भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा आहे. त्याची विविध रुपं आहेत. त्यामुळे भावेल त्या भावाने जो तो त्याचं स्मरण, पूजन करतो. एकीकडे तो तंत्रसाधकांसाठी परमपूज्य आहे. कडक सोवळ्यामध्ये, क्लिष्ट मंत्रोच्चारात षोडषोपचारे केलेली साग्रसंगीत पूजा त्याला प्रसन्न करते तर दुसरीकडे पोरासोरांनी उभारलेल्या अजागळ मंडपातही तो तितक्याच सहजतेने बैठक घेतो. त्याला मोदकाचा प्रसाद दाखवा वा गुळखोबर्याचा… स्वीकारात इतकी सहजता अथवा लवचिकता असल्यामुळे त्याचा धाक न वाटता लडिवाळ आपलेपणा जाणवतो. जुनंजाणतं सोवळं नेसून यथासांग पूजा करत असताना अंगावरच्या बर्म्युडानिशी सांजआरती करणार्‍या नातवालाही तो आपलासा वाटतो. अशा नानाविध गुणांनी संपन्न असणार्या गणपतीची महती काय वर्णावी!

- Advertisement -

तसं पाहता पूजनाच्या बाबतीत अग्रक्रम राखणारा गणेश दाराच्या चौकटीपासून वहीवरच्या पहिल्या पानावरील अक्षररुपापर्यंत सगळीकडे विराजमान असतोच. देव्हार्यात अन्य देवांची उपस्थिती असो वा नसो, गणेशाची मूर्ती असतेच असते. पण अशा सर्वव्याप्ती विश्वात्मकाच्या घरोघरी स्थापित होणार्या उत्सवी रुपात वेगळीच मोहकता असते हे नाकारता येणार नाही. निष्णात हातांनी बनवो वा अकशुल हातांनी, मातीच्या गोळ्यातून साकार होणारं ते गजमुख सर्वांगसुंदरच असतं. कारण ते साकारताना हृदयातला भक्तीभाव हाताद्वारे मूर्तीत झिरपतो आणि श्रद्धारुपी पुष्पार्पण केल्यानंतर चराचर व्यापलेलं ते दैवी तत्व अंशरुपाने त्यात प्रवेशल्याचा अनुभव मिळतो. हा विलक्षण आणि विलोभनीय अनुभव दर वर्षी नव्याने मिळत असल्यामुळेच वर्षानुवर्षर्ं सुरू असलेला गणेशोत्सव दर वर्षी नवा भासतो.

खरं पाहता गणेशाचा आकार फारसा आकर्षक नाही. सुस्वरुप या सदरात मोडतील अशा अनेक देवता आपल्या देवमंडळात समाविष्ट आहेत. कोणी रंगामध्ये उजवा, कोणी लेपन केलेल्या सामग्रीने सुगंधीत, कोणी आभूषणाने अलंकृत तर कोणी आणखी कशाने… त्या मानाने सुपासारखे मोठे कान, मोठं उदर, गजमुख असणारं, पोटापर्यंत सोंड रुळणारं गणेशाचं रुप ओबडधोबड म्हणावं असं… पण तेच अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. तीक्ष्ण नजर, गजाप्रमाणे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अफाट स्मरणशक्ती, भक्तगणांचं गार्हाणं सामावून घेणारे मोठे कान, दैत्यांचं हरण करण्यासाठी उगारलेले शस्त्रधारित कर, उंदरासारख्या लहानग्या वाहनावर असली तरी डौलदार बैठक अशा वैशिष्ट्यांनिशी प्रकटणारी मूर्ती परममंगल असते. म्हणूनच त्याचं पूजन मंगलकारी ठरतं.

गणपतीचं आगमन दर वर्षीच एक नवं चैतन्य घेऊन येतं. हे दहा दिवस आनंद, मांगल्य, पावित्र्य, सद्भाव आदींनी भारलेले असतात. तसं पहायला गेलं तरी गणपती आले म्हणून नेहमीची व्यवधानं सुटत नसतात. नोकरी-धंद्याचा व्याप ताप, अनेकांचं उपद्रवमूल्य, क्षणोक्षणी साथ करणार्‍या चिंता-व्यग्रता-व्यस्तता या सर्वांसहच आपण गणेशाला सामोरं जातो. या दहा दिवसात ना देशातलं वातावरण बदलतं ना जगातलं. बदल होतो तो आपल्या अंत:करणात, आपल्या मनात आणि आपल्या भावनेत. या उत्सवाचं काऊंटडाऊन मनात सतत सुरु असतं. आता तर सोशल मीडिया, पोस्टर्सच्या माध्यमातून उत्सवाबद्दलची ही आतुरता, ही उलटगणती समाजपटलावरही पहायला मिळते. ‘बाप्पांना यायला उरले फक्त अमूक दिवस’ अशा बातम्या नकळत आपल्या भावनांशी तादात्म्य पावतात आणि गणरायाची सरबराई करण्यासाठी, त्याच्या स्वागताच्या सिद्धतेसाठी मनापासून तयारी सुरु होते. एरवी दिवसभर काम करुन जीव इतका थकतो की काहीही नकोसं वाटतं. पण तेच गणपतीची तयारी म्हटलं की, अंगात दहा हत्तींचं बळ येतं. कुठून येतं हे बळ, कुठून मिळते इतकी ऊर्जा, कुठून येते ही शक्ती? ही शक्ती या विशालकाय देवतेच्या रुपात, तिच्या क्षमतेत, सामर्थ्यात दडली आहे. या देवतेकडे क्षमता आहे त्याचप्रमाणे शक्यता आजमावून पाहण्याची वृत्तीदेखील आहे. तिच्याकडे प्रगाढ बुद्धिमत्ता आहेच पण ती रुक्ष, निरस नाही.

शक्ती-बुद्धीची ही देवता ग्रंथाच्या प्रथम ओवीत, चरणात, पाठात, वंदिली जाते. त्याचप्रमाणे लोककलांमधूनही तिलाच प्रथम वंदन होतं. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी वंदिला जाणारा हा गणेश एखाद्या लहानग्याच्या इवल्याशा पाटीवरही हलकेच विसावतो. कोणत्याही अक्षरातून, रेषेतून, आकृतीतून, जिनसातून, वस्तूंमधून साकारली जाणारी या देवतेची प्रतिमा समाजाला काही शिकवणारी आहेच त्याचप्रमाणे घडवणारीही आहे. म्हणूनच नवसाची, कडक देवता असा भीतीयुक्त दबदबा कमी झाला आणि ङ्गबाप्पाफ अशी प्रेमळ साद समाजाने घातली तेव्हा जवळच्या नातलगाच्या आपुलकीच्या आवेशात जनसमुदायात येऊन बसला. सोसायटीतल्या कोपर्यांपासून महालांमधल्या प्रशस्त मखरांपर्यंत कुठल्याही वातावरणाचा स्वीकार करणारी, दहा दिवस लोकांबरोबर मजेत राहणारी, त्यांच्याबरोबर नाचणारी, गाणारी ही देवता आहे. म्हणूनच तिच्यासाठी आधी मनाचा गाभारा सजतो आणि नंतर देवळाराऊळांचा. आताही गणराय येण्याच्या सिद्धतेत आहेत. आजूबाजूच्या लखलखाटात कदाचित गणपतीला आपल्यातलं, समाजातलं वैगुण्य दिसणार नाही अथवा दिसलं तरी आपल्या आदरतिथ्याने भारावलेल्या अवस्थेत तो याकडे दुर्लक्ष करेल असा गैरसमज असेल. पण डोळे झाकले तरी त्याची चाणाक्ष नजर प्रत्येक ठिकाणी पोहोचेलच. त्याने चांगलं ते बघावंच त्याचबरोबर वाईटही बघावं. मागच्या वर्षी त्याच्या साक्षीने प्रचारकी थाटात दिलेली किती आश्वासनं पाळली गेली इथपासून वैयक्तिक पातळीवर सोडले गेलेले किती संकल्प तडीस गेले याचा लेखाजोखाही या देवतेने मांडावा.

काय बदललं हो गेल्या वर्षात? देशपातळीवर म्हणाल तर आज ड्रॅगन डोळे वटारुन उभा आहे. काश्मीरसारखं नंदनवन अतिरेक्यांच्या काळ्या कृत्यांमध्ये घुसमटतंय. या वर्षी सीमेवर हौतात्म्य पत्करणार्या वीर जवानांच्या सरणाला चूड लावणारे लहानगे आपण पाहिले. तरुण विधवांचा काळजाला घरं पाडणारा आक्रोश ऐकला. यात्रेकरुंच्या गाड्यांना झालेले भीषण अपघात पाहिले. यात्रेकरुंच्या गाड्यांवर झालेले गोळीबार, भीषण अपघात पाहिले. दहशतवादाचा भेसूर चेहरा जागोजागी, प्रांतोप्रांती दिसत राहिला. देशपातळीवर हा तणाव असताना वैयक्तिक पातळीवरील तणाव हाताळण्यात अपयशी ठरल्याने मृत्यूला कवटाळणारे अनेक जीवही आपण पाहिले. मृत्यू, मग तो नैराश्यग्रस्ततेमुळे, नापिकीमुळे, ताणामुळे, अनारोग्यामुळे, सेल्फीसारख्या नसत्या अगोचरामुळे… कशामुळे का आलेला असेना, जगण्यापेक्षा स्वस्त झालेला आपण पहात आहोत. पाच वर्षाचा लहानगा असो, पन्नास वर्षाचा प्रौढ असो वा पंच्याण्णव वर्षाचा वृद्ध असो… जगण्याचा उबग सगळीकडेच बघायला मिळतोय. आज कशाकशाचा ताण घेतोय आपण! मुलींवर होणार्या अत्याचारांचा, विवाहितांच्या जाचाचा, मुलांच्या व्यसनाधीनतेचा, गळेकापू स्पर्धेचा, जीवनातून हरवलेल्या शांततेचा… आगामी दहा दिवसात जणू यातले कोणतेच प्रश्न नसल्याच्या अविर्भावात समाजाची वर्तणूक असेल. पण नंतर काय? पहिले पाढे पंचावन्न!

गणरायानं उघड्या डोळ्यांनी हे सगळं पहावं. तो सुखकर्ता आहे, दु:खहर्ता आहे. दु:खाचं परिमार्जन करण्यासाठी तो येतो आहे. तेव्हा त्याने छत्राखालील गैरकृत्यांचा तरी समाचार घ्यावा. त्याचे विशाल कान सूक्ष्मातील सूक्ष्म आवाज टिपणारे आहेत. त्याने जनसामान्यांचा हा हुंकार ऐकावा. त्याचे डोळे लहान असले तरी दृष्टी विशाल आहे. या दृष्टीने समाजातली विदारकता पहावी. त्याने ही क्षमता वापरावी, उत्सवमूर्ती असल्याचा परिपूर्ण आनंद लुटावा पण या उत्सवाच्या आड दडून पार पडणार्या गैरकृत्यांचाही समाचार घ्यावा. गणांचा अधिपती असणार्या गणपतीने केवळ मूषकाच्या कानात सांगितल्या जाणार्या गार्हाण्यांचाच नव्हे तर सर्वांच्या मनातल्या आक्रोशाचाही विचार करावा. तू बुद्धी देणार तसे आम्ही वागणार. म्हणूनच आता तरी डोळे उघडून सगळं बघ. तू सद्बुद्धी देत असशील तर दुर्बुद्धीही तूच देतोच हे मान्य कर. सगळी जबाबदारी स्वत:च्या शिरी घे आणि दहा दिवस स्वत:ची काळजी घे…

– स्वाती पेशवे

- Advertisment -

ताज्या बातम्या