Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशArogya Setu App : केंद्रीय माहिती आयोगाच्या नोटीसनंतर सरकारचे स्पष्टीकरण

Arogya Setu App : केंद्रीय माहिती आयोगाच्या नोटीसनंतर सरकारचे स्पष्टीकरण

दिल्ली | Delhi

भारतात करोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांपैकी आरोग्य सेतू अ‍ॅप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे. २ एप्रिल रोजी केंद्र सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केले होते, तेव्हापासूनच हे अ‍ॅप वादग्रस्त राहिलं आहे. मात्र हे अ‍ॅप नेमकं बनवलंय कुणी याचं उत्तरच सरकारला देता येत नाहीय, असं माहिती अधिकारात उघड झालं होतं. यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

केंद्र सरकाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “आरोग्यसेतू अ‍ॅपच्या संदर्भात माहिती अधिकार चौकशीच्या संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांविषयी माध्यमांच्या वृत्तांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, एनईजीडी आणि एनआयसीचे सीआयसी, सीपीआयओ यांना 24 नोव्हेंबर 2020 रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आदेशाचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलत आहे.

यासंदर्भात, हे स्पष्ट करण्यात येत आहे की, आरोग्यसेतू अ‍ॅप आणि त्याचे कोविड-19 संक्रमण रोखण्यातील महत्त्व याविषयी कसलीही शंका नाही. 2 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजेस आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केल्याप्रमाणे, भारत सरकारने कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने लोकांना एकत्र आणण्यासाठी आरोग्यसेतू अ‍ॅप सुरू केले. आरोग्यसेतू अ‍ॅप विक्रमी 21 दिवसांत विकसित करण्यात आले. टाळेबंदीतील निर्बंध आणि मेड इन इंडिया संपर्क मागोवा अ‍ॅप विकसित करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग, शैक्षणिक विभाग आणि सरकार यांनी चोवीत तास कार्यरत राहून संक्रमण परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मजबूत, व्यापक आणि सुरक्षित अ‍ॅप विकसित केले. 2 एप्रिल 2020 पासून आरोग्यसेतू अ‍ॅपवर अधिकृत बातम्या आणि अपडेटस प्रसारीत केले, यात 26 मे 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या ओपन सोर्स कोडचाही समावेश आहे. अ‍ॅप विकसित करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी संबंधित सर्व व्यक्तींची नावे प्रसार माध्यमांतून जाहीर करण्यात आली.

तसेच यासंबंधीची माहिती https://github.com/nic-delhi/AarogyaSetu_Android/blob/master/Contributors.md या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सर्व प्रसंगी, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, एनआयसीने हा अ‍ॅप संबंधित उद्योग आणि शैक्षणिक जगताच्या सहकार्याने विकसित केला आहे. आरोग्यसेतू अ‍ॅप अतिशय पारदर्शी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे आणि गोपनीय धोरणासह सर्व तपशील आणि कागदपत्रे तसेच डेटा अ‍ॅक्सेस आणि माहिती सामायिक करण्याविषयीचे प्रोटोकॉल 11 मे 2020 रोजी जारी करण्यात आले आणि ते aarogyasetu.gov.in या आरोग्यसेतू पोर्टलवर अपलोड करण्यात आले. पोर्टलवर अ‍ॅपची कार्यपद्धती, कोविड अपडेटस आणि आरोग्यसेतूचा वापर का करावा याचा तपशील उपलब्ध आहे. आरोग्यसेतू अ‍ॅपविषयीचे नियमित अपडेटस समाजमाध्यमातून आणि सरकारी पोर्टलवर वेळोवेळी सामायिक केले जात आहेत. अनेक दूरचित्रवाहिनी कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांतून अ‍ॅपचा तपशील, त्याचा विकास आणि कोविड-19 विरोधातील लढाईतील सहाय्य याविषयी माहिती देण्यात आली.

तसेच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, शासकीय आणि खासगी सहभागीतेतून अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. आतापर्यंत 16.23 कोटी वापरकर्त्यांनी अ‍ॅप डाऊनलोड केला आहे आणि कोविड-19 विरोधातील लढाईत आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना याची मोठी मदत होत आहे. कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना ब्ल्युटूथ संपर्कातून शोधण्यास मदत झाली आहे आणि नागरिकांना सुरक्षित राहण्यास यामुळे मदत झाली आहे. ब्ल्युटूथ संपर्क माध्यमातून कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना सूचना, अलगीकरण किंवा चाचणी याविषयी सूचित केले जाते. या माध्यमातून ज्या व्यक्तींना चाचणी करण्यास सांगण्यात आले होते, त्यापैकी 25% व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळल्या. एकूण पॉझिटीव्ह दर 7-8% पेक्षा हे प्रमाण अधिक आहे. अशाप्रकारे चाचण्यांची कार्यक्षमता आरोग्यसेतूमुळे वाढली आहे. याव्यतिरिक्त, आरोग्यसेतू इतिहास (ITIHAS) प्रणालीमुळे आरोग्य प्राधीकरण आणि प्रशासनाला संभाव्य हॉटस्पॉटसची माहिती मिळाली आणि त्यापद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या.

अशाप्रकारे कोविड-19 विरोधातील लढाईत आरोग्यसेतूची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. नुकतेच, जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील संक्रमण परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्यसेतूच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.”

असे काम करते ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’..

केंद्र सरकारच्या सूचनेवरून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) तत्त्वावर हे अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. अ‍ॅप सुरू करण्यासााठी युजरला सर्वात आधी स्वतःचं मूल्यांकन करावं लागतं. सहाजिकच अ‍ॅपवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो आणि ओटीपी टाकून अ‍ॅप सुरू करता येतं. अ‍ॅपमध्ये पुढे तुम्हाला तुमचं लिंग, वय विचारण्यात येईल. त्याननंतर परदेश प्रवासाचा इतिहास, सर्दी, खोकला, ताप यासारख्या प्रश्नांची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यावी लागतील. तुम्हाला मधुमेह, रक्तदाब यासारखे काही आजार आहेत का, हेदेखील विचारलं जातं. अ‍ॅप ऍक्टिव्ह करण्याच्या प्रक्रियेत योग्य माहिती भरा, अशी सूचना वारंवार येते. त्यामुळे इथे एक प्रश्न सहाजिकच उद्भवतो की अ‍ॅपमध्ये माहिती भरताना एखाद्या व्यक्तीने किंवा अनेकांनी एखादी माहिती लपवली तर त्याची पडताळणी कोण आणि कशी करणार? अ‍ॅपमध्ये सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व आणि ते कसं पाळायचं, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय करोनाविषयीचे सर्व ताजे अपडेट्सही येत राहतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या