Thursday, April 25, 2024
Homeनगरलष्कराच्या ‘त्या’ पत्रामुळे बांधकामे खोळंबली !

लष्कराच्या ‘त्या’ पत्रामुळे बांधकामे खोळंबली !

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

के.के. रेंज पार्ट दोन विस्तारिकरणाचा विषय नगरपासून ते दिल्लीपर्यंत गाजत असताना आता लष्कराने त्यांच्या

- Advertisement -

हद्दीलगत असलेल्या गावांतील बांधकामांना महसूल विभागाने परवानगी देऊ नये, असे पत्रच नगरच्या प्रांत कार्यालयाला पाठवलेे आहे. यामुळे शहर परिसरातील लष्कराच्या हद्दी लगतच्या गावांतील बांधकामे काही महिन्यांपासून खोळंबली आहेत.

खोळंबलेल्या बांधकामाच्या परवान्यांच्या फाईल्स लष्कराच्या नगर कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. त्या फाईल्स आता पुण्याच्या कार्यालयात परवानगीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. या फाईल्सवर पुण्यातील लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी परवानगी दिल्यानंतर बांधकाम सुरू करता येणार आहे. विनापरवाना बांधकाम करणार्‍यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा लष्कराने महसूल विभागाला दिलेल्या पत्रात दिला आहे.

नगर शहरालगत असणार्‍या बुर्‍हाणनगर, नागरदेवळे, निंबोडी, वाकोडी, दरेवाडी यासह लष्कराला लागून असणार्‍या गावांतील बांधकाम परवान्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी नगर प्रांत कार्यालयात पाठविण्यात आले होते. मात्र, लष्कराच्या हद्दील लागून असलेल्या या गावातील बांधकामाला महसूल खात्याने परवानगी देऊ नये, असे स्पष्ट पत्र लष्कराच्या भूमी विभागाचे अधिकारी एम. भारद्वाज यांनी महसूल विभागाला पाठविले आहे.

यामुळे नगर प्रांत कार्यालयाने हे सर्व प्रस्ताव आता नगर येथील लष्कराच्या कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविले आहेत. लष्कराने मान्यता दिल्यानंतरच दोन मजल्यापेक्षा अधिक उंची असणार्‍या बांधकामांना महसूल विभागाकडून मान्यता मिळणार आहे.

हॉस्पिटलही रडारवर

लष्कराने नुकत्याच केलेल्या सर्वेेक्षणात न्यायनगर परिसराजवळ असणारे एक मोठे हॉस्पिटल रडारवर आले आहे. या हॉस्पिटलची उंची अधिक असल्याने याबाबत आक्षेप घेतला जाईल, अशी शंका महसूल विभागाला आहे. यापूर्वी या भागातील उंच शासकीय इमारतींवर देखील लष्कारने आक्षेप घेतलेला आहे. आता नव्याने सर्वेक्षण झाले आहे. त्यात काय-काय अडचणीत येणार, हे लष्कराच्या भुमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.

चांदणी चौक ते लष्कर कॅम्प सर्वेक्षण

दरम्यान, नगर येथील लष्कराच्या अधिकार्‍यांनी चांदणी चौक, सोलापूर रोड, जामखेड रोड आणि लष्कराच्या अन्य हद्दीपर्यंत असणार्‍या भागाचे आणि इमारतींचे फोटोसह सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर लष्कराने याबाबतची कल्पना महसूल विभागाला दिली आहे. यामुळे थांबविण्यात आलेल्या बांधकाम परवानगीच्या विषयावर अधिक काही बोलण्यास महसूल खात्याने नकार दिला आहे. मात्र, बांधकामासाठी परवानगीच्या प्रतिक्षेतील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

500 मीटरच्या आत लष्कराचा आक्षेप

लष्कर हद्दीच्या 500 मीटरच्या आंतरात कोणालाही बांधकामाची परवानगी नाही. मात्र, हे अंतर किंवा हद्द लष्कर विभागच निश्चित करू शकतो. यामुळे सध्या मोठ्या संख्येने बांधकाम परवानगीचे प्रस्ताव त्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या