Tuesday, April 23, 2024
Homeनगरसैन्यदलात नोकरीच्या अमिषाने 11 लाखांना गंडा

सैन्यदलात नोकरीच्या अमिषाने 11 लाखांना गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट ना हरकत (एनओसी) प्रकरणी अटकेत असलेला राजेंद्रसिंग देशराजसिंग उर्फ राजा ठाकूर याचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. त्याने सैन्यदलात सफाई कामगाराची नोकरी लावण्याच्या अमिषाने एका व्यक्तीची 11 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ठाकूरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विक्रम विजय छजलाने (वय 39, रा.हरी मळा, सोलापूर रोड, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सैन्यदलातून निवृत्त झालेला व सध्या सैन्य दलाच्या ए.सी.रेकॉर्डस् विभागात कंत्राटी स्वरूपात काम करत असलेला ठाकूर याची पत्नी ही ब्रिगेडीयर यांची स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. याचा गैरफायदा घेत ठाकूरने अनेक गैरकृत्य केल्याचे आता उघडकीस येत आहे. बांधकाम परवानगीसाठी लष्कराची बनावट एनओसी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यातच आता त्याच्याविरूध्द भिंगार पोलीस ठाण्यात 11 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकूर याने छजलाने यांना तुमच्या पत्नीस भारतीय सैन्य दलात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावतो, अशी बजावणी केली. तसेच माझी पत्नी ब्रिगेडीयर यांची स्विय सहाय्यक असल्याने त्या अनुषंगाने माझे सैन्यदलात उच्च अधिकारी परिचित आहेत. आतापर्यंत मी अनेक लोकांची नोकरीची कामे करून दिलेली आहेत. तुमच्या पत्नीला नोकरीला लावण्यासाठी अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतील,असे सांगितले. त्यामुळे छजलाने ते नोकरी करत असलेल्या संस्थेच्या कर्मचारी सोसायटीमधून जमा रक्कम तसेच नातेवाईक, मित्रमंडळ यांच्याकडून जुळवाजुळव करून सहा लाख रुपये रोख स्वरूपात 2018 मध्ये दिले.

उर्वरित पाच लाख रुपये देण्यासाठी फिर्यादी छजलाने यांनी पतसंस्थेत दागिने गहाण ठेवून सोनेतारण कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम भिंगार अर्बन बँकेच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर फिर्यादी छजलाने यांनी राजा ठाकूर याच्या बँक खात्यात 15 सप्टेंबर 2020 रोजी आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविली. त्यानंतर नोकरीकामी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत तुझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीन, तुझ्या मुला बाळांना जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर छजलाने यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या