Tuesday, April 23, 2024
Homeनगरदारू विक्रेत्यांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांवर कारवाई करा

दारू विक्रेत्यांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांवर कारवाई करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावात कायमस्वरूपी दारू विक्री करण्यास बंदी करण्यात आली असतानाही पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने दारू विक्री पुन्हा सुरू झालेली आहे.

- Advertisement -

दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी राहाता तालुक्यातील आडगाव बु. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी अधीक्षक पाटील यांना दिले आहे.

गावामध्ये शासनमान्य एकही दारूचे दुकान नाही. परंतु, चोरून दारू विक्री करणारे तीन अड्डे आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असून त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणून दारू विक्री बंद करण्याबाबत पोलीस खात्याच्या सहकार्याने 18 जून 2020 रोजी ग्रामसभेत ठराव करून दारू विक्री बंद केली होती. परंतु, ऑक्टोबर 2020 पासून लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी फुलारे व लांडे यांच्या आशिर्वादाने दारू विक्री जोरात सुरू झाली आहे.

दारू अड्ड्यांमुळे शाळेत जाणार्‍या, येणार्‍या मुला-मुलींना त्रास होत आहे. त्यामुळे गावाची सुरक्षा व शांतता धोक्यात आली आहे. तरी दारू विक्री करणार्‍यांवर व त्यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर भाऊसाहेब लहामगे, प्रभाकर वराडे, पंढरीनाथ तेलंग, अशोक लहामगे, सारंगधर लहामगे, राजत शेळके, रावसाहेब शेळके, नवनाथ आंबेकर, संजय कानडे, रामदास वराडे, विजय धागक, बाळासाहेब वराडे, बाळू बोधक, दीपक साळवे, संजय साळवे यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या