Tuesday, April 23, 2024
Homeनगरजलवाहिनी फुटून पाणी राज्यमार्गावर, नागरिक त्रस्त

जलवाहिनी फुटून पाणी राज्यमार्गावर, नागरिक त्रस्त

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीचा सध्या ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या पध्दतीने कारभार सुरू आहे. मुलभूत समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तसेच ढिसाळ नियोजनामुळे वारंवार जलवाहिनी फुटून पाणी थेट राज्यमार्गावरून वाहत आहे. त्यामुळे कांदा बाजारात जाणारे वाहनधारक व नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

टाकळीभान ग्रामपंचायतीत नागरिकांंनी एकहाती सत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे 17 पैकी 16 सदस्य निवडून देऊन महाविकास आघाडीला गेल्या दीड वर्षांपूर्वी एकहाती सत्ता दिली. मात्र सहा महिन्यांतच मतदारांचा भ्रमनिरास झाला. महाविकास आघाडीत निवडून आलेल्या 16 सदस्यांमध्ये लाथाळी सुरू झाल्याने दोन गट अस्तित्वात येऊन या गटातच जिरवाजिरवीचे राजकारण सुरू झाल्याने ग्रामविकासालाच तिलांजली देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. मुलभूत समस्येबाबत तक्रार कोणत्या गटाकडे करायची? हा प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे.

महाविकास आघाडीच्या 16 पैकी 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या विवाद अर्जाचा निकाल लागून त्या दहा सदस्यांचे सदस्यपद अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत त्या दहा सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल करून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला अंतरीम स्थगिती घेतली असली तरी त्यांच्या सदस्यपदावर टांगती तलवार आहे. या कारवाईत सरपंच व उपसरपंच दोघांचाही समावेश असल्याने सध्या सुरू असलेला कारभार हा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या पध्दतीचा सुरू आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. लहु कानडे यांनी पाणीपुरवठा योजनेला 24 तास वीज उपलब्ध व्हावी, यासाठी 17 लक्ष रुपयांचा निधी देत पाणीपुरवठ्यासाठी 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे केवळ प्रभाग क्रमांक एक व सहा या प्रभागांनाच या योजनेचा फायदा मिळत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यातून रस्त्यावर पाणी येऊन दलदल निर्माण होताना दिसत आहे. बसस्थानक परिसरातील नेवासा रोडलगत असलेल्या बाजार समितीच्या उपबाजार आवाराजवळील गेटजवळ वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने उपबाजारात जाणार्‍या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जलवाहिनीचे पाणी थेट नव्याने झालेल्या राज्यमार्गावरून वाहत असून या संपूर्ण परिसराला दलदलीचा सामना करावा लागत आहे. सुमार दर्जामुळे वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होताना दिसत आहे. इतर विकास कामांबाबतही वेगळेपणा नसल्याचे ग्रामस्थांमध्ये सध्या बोलले जात आहे.

एकंदरित सदस्यांमधील झालेली दुफळी व त्यातच 10 सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार यात संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य गुरफटले गेल्याने सध्या तरी ग्रामपंचायत प्रशासनाचा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असा कारभार सुरू असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या