Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशडोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर

दिल्ली | Delhi

मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटोल हिल या संसदेच्या इमारतीत धुडगूस घालत हिंसाचार केला होता. त्यानंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण पेटले होते. डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग खटला चालवण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवण्यास अमेरिकेच्या संसदेने मंजूरी दिली आहे.

- Advertisement -

डेमोक्रॅटिक-नियंत्रित प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसर्‍या महाभियोगावरील चर्चेनंतर महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ च्या विरोधात २३२ मतांनी संमत झाला. १० रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता हा प्रस्ताव १९ जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोग प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडीओ केला प्रसिद्ध

कारवाई सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती टाळा असंही म्हटलं आहे.

“हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसंच आपल्या चळवळीविरोधात आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीनं धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केलं असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही आहात. तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केलं जाणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी यावेळी कॅपिटॉल हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं आहे. “कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचं राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी काही सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख केला. हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचं ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

एकाच राष्ट्राध्यक्षावर कार्यकाळात दुसऱ्यांदा महाभियोगाचा खटला

एखाद्या राष्ट्राध्यक्षावर त्याच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा महाभियोग चालण्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. सभागृह अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांनी महाभियोग प्रक्रियेची अधिकृत माहिती दिली. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर आता सिनेटमध्ये खटला चालणार आहे. मात्र, ट्रम्प यांच्या कार्यकाळास अवघे ६ दिवस राहिले आहेत. २० जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शपथ घेणार आहेत. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण झाली तर ट्रम्प यांच्यावरील खटला यशस्वी होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या