Friday, April 26, 2024
Homeनाशिकजि. प. त अनुकंपा तत्त्वावर 62 जणांना नियुक्तीपत्र

जि. प. त अनुकंपा तत्त्वावर 62 जणांना नियुक्तीपत्र

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.3) झालेल्या पडताळणीनंतर 62 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्तीपत्र देण्यात आली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत 2015 मध्ये अनुकंपा तत्त्वावर भरती झाल्यानंतर चार वर्षांपासून रिक्त झालेल्या जागा अनुकंपा तत्त्वावर भराव्यात यासाठी 296 उमेदवार इच्छुक होते. जिल्हा परिषदेने त्यांची भरती करण्याचा निर्णय करण्यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज मागवले. त्यानुसार त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. यापूर्वी देखील या उमेदवारांना वेळीवेळी कागदपत्रे छाननीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, कधी मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर कधी बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे या बैठका झाल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलवले खरे. मात्र, याच दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने शासनाकडे अनुकंप नियुक्तीच्या अनुषगांने परिचर नियुक्ती संदर्भात मागविण्यात आलेले मार्गदर्शन पत्र प्राप्त झाले. या पत्रात सद्यस्थितीत सर्व जिल्हा परिषदेकडील 2019 मधील पदभरती मध्ये वर्ग-4 ची पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पदभरतीत समावेश नसलेली पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राह्य धरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ज्येष्ठता सुची तयार करून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले.

याचाच अर्थ परिचरांना अनुकंपा नियुक्ती प्रक्रीयेत नियुक्ती देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते. यावर जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविले असता, त्यावर शासनाने रिक्त जागांच्या 20 टक्के गट क व ड मधून सर्व पदे भरावीत, असा आदेश काढला. पात्र उमेदवारांना मंगळवारी कागदपत्र तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, महेंद्र पवार, रणजीत पगारे, मंगेश केदारे, किशोर पवार, प्रमोद ढोले, शिवराम बोटे उपस्थित होते.

पदनिहाय नियुक्ती
विस्तार अधिकारी-1
वरिष्ठ सहायक-1
परिचर-18
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-1
आरोग्य सेवक-23
स्थापत्य सहायक-4
शिक्षण सेवक-4
अंगणवाडी पर्यवेक्षिका-1
कंत्राटी ग्रामसेवक-7
पशुधन पर्यवेक्षक-2
एकूण-62

- Advertisment -

ताज्या बातम्या