शिरपूर, दोंडाईचासह नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

धुळे Dhule।। प्रतिनिधी

डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा -वरवाडे नगरपालिकांसह (municipalities) खानदेशातील तब्बल 15 नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती (Appointment of Administrators) करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) घेतला आहे.

संपूर्ण जगभरात कोविड- 19 विषाणूंच्या संक्रमणाचा धोका पाहता या मुदत संपत आलेल्या पालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पाडणे शक्य न झाल्याने तसेच यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रशासक नियुक्तीबाबत कळविले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हटले आहे.

या नगरपालिकांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेषत सन 2021 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 6 नुसार अंतर्भूत केलेल्या कलम 317 (3) मधील तरतुदीनुसार राज्यातील 29 नगरपालिकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकार्‍यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या नगरपालिकांची मुदत संपताच संबंधित अधिकारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारतील.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर-वरवाडे व दोंडाईचा-वरवाडे या दोन नगरपालिकांची मुदत 28 डिसेंबरला संपली आहे. यामुळे शिरपूर-वरवाडे या पालिकेत उपविभागीय अधिकारी, तर दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेत शिंदखेड्याचे तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.