वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज करावे : आदिवासी आयुक्त सोनवणे

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शासकीय आदिवासी वसतीगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शैक्षणिक वर्ष सन २०२०-२०२१ हे उशिरा सुरु करण्यात आले.

या कारणास्तव आदिवासी विकास विभागाचे शासकीय विद्यार्थी वसतिगृहे देखील बंद होती.

मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या मान्यतेनुसार राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा,अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे व नामांकित शाळेतील इयत्ता ५वी ते इयत्ता १२वीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आले आहेत. वर्ग सुरू झाल्याने शासकीय वसतीगृहे देखील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे.

त्यामुळे शैक्षणिक वर्ष सन २०२०-२०२१ साठी आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अनुसूचित जमातीच्या इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी तसेच या व्यतिरिक्त पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व इतर अभ्यासक्रमाच्या अशा सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज ३१ मार्च २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

सादर झालेल्या अर्जातून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृह क्षमतेनुसार सर्व वसतिगृहामध्ये प्रवेश क्षमता नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यास त्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेप्रमाणे विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व मार्गदर्शक सूचना वसतीगृहाना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शाळा, महाविद्यालये बंद असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या शिक्षणाची माहिती घेण्यात येणार आहे.”

हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग