Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरराजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ

राजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

कित्येक वर्षे नगरपरिषदेत सत्ता, स्वतःच्या घरातच नगराध्यक्षपद, घरातच आमदारकी, गल्ली ते दिल्ली सरकार यांचेच, कित्येकवेळा जनतेने यांना संधी देऊन सुद्धा गावात यांना ग्रामीण रुग्णालय देखील आणता आले नाही. गावात ग्रामीण रुग्णालय झाले असते तर अद्ययावत इमारतीसह सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन गावातच उपलब्ध झाले असते.

- Advertisement -

परंतु तसे न झाल्याने यांना ‘हातापाया पडत डॉक्टर आणले’ असे म्हणायची वेळ नगराध्यक्षांवर आली आहे. म्हणजेच नगराध्यक्षांना स्वतःच्याच पक्षाचा नाकर्तेपणा मान्य आहे, असा टोला आप्पासाहेब ढुस यांनी नगराध्यक्ष कदम यांचे नाव न घेता लगावला आहे. ते म्हणाले, आता हा कलगीतुरा थांबवून कृपया आमच्या मागण्या मान्य करा आणि देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना मोफत उपचार द्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.

ढुस म्हणाले, यांनी ठरविले असते तर यांच्याच ताब्यात असलेल्या त्रिंबकराज स्वामी महाराज आणि ग्रामसुधारणा मंडळाच्या कित्येक एकर जमिनीपैकी एक एकर जागा देऊन यांना ग्रामीण रुग्णालय करता आले असते. पण केवळ गावाला वेठीस धरण्यासाठी यांनी कधीच गावात ग्रामीण रुग्णालय तर केले नाहीच पण भव्य एस. टी. स्टँड यांना बनवता आले नाही. ना पोलीस ठाणे, उलटपक्षी असलेल्या पोलीस ठाण्याच्या जागेवर आरक्षण टाकून त्यात खोडा घालण्याचे काम करून गावात गुन्हेगारीला रान मोकळे करून देण्याचे पापही यांच्याच गटाच्या कार्यकाळात झाले.

नगराध्यक्षांनी कलगीतुरा करीत बसण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य कराव्यात. कलगीतुरा करण्याची ही वेळ नाही. कोविडमुळे नागरिकांची उत्पन्नाची साधने थांबली आहेत, हाताला रोजगार नाही, व्यवसाय ठप्प झालेत, अशा परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी लाखो रुपयांची बिले आकारून त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. जर तुम्हाला हातापाया पडून डॉक्टर मिळाले म्हणता, तर मग नगरपालिकेने त्याच डॉक्टरांच्या मदतीने ते सेंटर अल्पदरात का चालविले नाही?

बिलाचे पैसे मिळणार नाहीत या भीतीने स्वतःच्या सालगड्याला शासकीय कोविड सेंटरमध्ये पाठविले. हे न समजण्याइतकी देवळालीची जनता भोळी नाही. त्यामुळे आमच्या बिलाची चिंता तुम्ही करू नका. गरिबांना आपल्या गावात मोफत सेवा कशी देता येईल? त्यादृष्टीने आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन व त्याला राजकीय आखाड्याचा रंग न देता कलगीतुरा थांबवून आमच्या मागण्या मान्य करा, अशी परखड भूमिका अप्पासाहेब ढुस यांनी मांडली.

दरम्यान सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय कडू यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोविड सेंटरबाबत पत्र पाठविले आहे. त्यात नगरपरिषद देवळाली प्रवरा हे सुरू करत असलेल्या कोविड सेंटरबाबत असलेल्या अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. देवळाली प्रवरा शहर 40 हजारांच्यावर लोकवस्ती असलेले नगरपरिषदचे गांव आहे. पहिल्या लाटेत फारसा संसर्गाचा फटका या शहरास बसला नाही. मात्र, दुसर्‍या लाटेत जबरदस्त संसर्गाचा तडाखा शहरास बसला आहे. गावातील अपुर्‍या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांची अंत्यत पळापळ झाली. त्यात काही रुग्ण गंभीर होऊन दगावले आहेत.

गावात सर्व कोविड सेंटर खासगी असल्याने गोरगरीब जनतेला याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी धावपळ करत इलाज घ्यावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन खा.सदाशिव लोखंडे व आ. लहू कानडे यांचे सहकार्याने शासकीय विलगीकरण कोविड सेंटर सुरू केले. हे सेंटर गेले महिनाभर पूर्ण क्षमतेने सुरु असून शेकडो रुग्ण बरे होऊन गेले आहेत. संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी गेल्या पंधरवड्यात नगरपरिषदेस 100 बेडचे ऑक्सीजन सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषदेस हे सुरु करताना तज्ज्ञ डॉक्टर, ऑक्सीजन पुरेसा साठा, दैनंदिन व्यवस्थापन खर्च अशा बाबी अडचणीच्या ठरत आहेत.

याबाबत नगरपरिषदेसोबत तातडीने बैठक आयोजित करावी. जेणेकरून याबाबत येत असलेल्या अडचणी दूर होऊन गोरगरिबांसाठी मोफत ऑक्सीजन 100 बेडचे कोविड सेंटर सुरू होईल, असे कडू यांनी ना. एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या