Saturday, April 27, 2024
Homeनगरआंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का ?

आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का ?

सुपा (वार्ताहर)-

निवडणुकीच्या वेळी मते मागायला शेतकर्‍यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाहीत? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का?

- Advertisement -

उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्र सरकारला उद्देशून उपस्थित केले आहेत. या आंदोलनाला हजारे यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या पंजाब आणि परिसरातील शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. याच शेतकरी संघटना हजारे यांच्या लोकपाल आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावरील आंदोलनाच्या वेळी दिल्लीत हजारे यांच्यासोबत आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी हजारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी हजारे म्हणाले, कृषीप्रधान देशात शेतकर्‍याला सरकारकडून दिली जाणारी ही वागणूक योग्य नाही. निवडणुका आल्या की राजकारणी मंडळी शेतकर्‍यांच्या बांधावर, घरी जाऊन मतं मागतात. मग त्यांच्या मागण्यासंबंधी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? शेतकर्‍यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

यामध्ये एका शेतकर्‍याचा मृत्यूही झाला आहे. तरीही अद्यापही शेतकरी संयमाने आंदोलन करीत आहेत. यातून हिंसा भडकली तर याला जबाबदार कोण,फ असा सवाल करून हजारे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

हजारे म्हणाले, सरकार चर्चा करून प्रश्न सोडविण्याऐवजी शेतकर्‍यांचे अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी शत्रूप्रमाणे सरकार वागत आहे. मुळात शेतकर्‍यांना पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागावे हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे. सरकार आणि शेतकरी यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे.

शेतकरी हिंसक आंदोलन करणार नाहीत, यावर माझा विश्वास आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाला कधीही हिंसक वळण लागू दिले नाही. सरकारला जर खरेच प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली पाहिजे.

आज जे सुरू आहे, ते मात्र अत्यंत चुकीचे आहे. सरकार आणि शेतकरी दोघेही आपल्याच देशाचे आहेत. शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत न पाहाता लवकरात लवकर चर्चा केली पाहिजे. त्यातून काही तरी नक्कीच मार्ग निघेल. या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या