पाच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद !

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गामुळे लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात जनावरांचे बाजार बंदच आहेत. यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढालच ठप्प झाली आहे.

त्यात आता लंपी स्कीन डिसीज या आजाराने डोकेवर काढले असल्याने शेतकरी जनावरांची खरेदी विक्री टाळतांना दिसत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दरवर्षी राज्यातील अन्य जिल्ह्यासह पर राज्यातून व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येत होते. मात्र, करोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पशूधनाचा व्यापार ठप्पच झाला आहे.

नगर जिल्ह्यात लोणी (ता. राहाता), घोडेगाव (ता. नेवासा) आणि काष्टी (ता.श्रीगोंदा) या ठिकाणी जनावरांचे मोठे बाजार भरतात. या ठिकाणी अन्य जिल्ह्यातून आणि गुजराथ राज्यातून व्यापारी आणि शेतकरी वेगवेगळ्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात.

घोडगावचा बाजार हा म्हशीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गीय म्हशी खरेदी-विक्रीसाठी येत असत. लोणीच्या बाजार हा संकरीत गायींसाठी सुपरिचित आहे. तर काष्टीचा बाजार हा बैल, गायी आणि म्हशींच्या खेरदी-विक्रीसाठी प्रसिध्द आहे.

साधारणपणे मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात करोना लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील जनावरांचे बाजार देखील लॉक झाले आहेत. एकीकडे शेतकर्‍यांच्या दुधाला भाव नाही, तर बाजार सुरू नसल्याने शेतकर्‍यांना त्यांची जनावरे विक्री करता येईन, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

यासह जिल्ह्यात संगमनेर, वाळकी, पाथर्डी, जामखेड आणि राशिन या ठिकाणी लहान स्वरूपात जनावरांचा बाजार भर असत. मात्र, हे बाजार देखील सध्या बंद आहेत. जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे मोठ्या 2 लाख जनावरांची खरेदी-विक्री होत असून त्यातून कोट्यावधी रुयांची उलाढाल सुरू होती. मात्र, करोनाच्या संकाटमुळे जनावरांचे बाजारच उध्दवस्त झाले आहेत.

त्यात आता जिल्ह्यात मराठवाड्यामार्गे संसर्गजन्य विषाणूचापासून होणार्‍या लंपी स्कीन डिसीज हा रोग येवू पाहत आहे. आता सरकारने जनावरांच्या वाहतुकीला परवानगी दिली तरी जोपर्यंत या रोगाचे समुळ उच्चाटन अथवा सर्व जनावरांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत जनावरांची एका भागातून दुसर्‍या भागात वाहतूक धोक्याचे निमंत्रण ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *