Wednesday, April 24, 2024
Homeनगरतिळापूरला अज्ञात आजाराने जनावरांचे मृत्यूचक्र सुरूच !

तिळापूरला अज्ञात आजाराने जनावरांचे मृत्यूचक्र सुरूच !

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील तिळापूर गावात अज्ञात आजाराने गेल्या पंधरा दिवसात सुमारे अठ्ठावीस जनावरांचे मृत्यू झाले. अजूनही हे मृत्यू तांडव सुरूच असून दिपावली, पाडवा आणि बलीप्रतिपदेला येथील बळीराजा पुरता खचून गेला आहे. शेतकर्‍यांच्या कुटुंबातील माताभगिनी, लहान मुलेही ढसाढसा रडत आहेत. दिपावलीच्या लक्ष्मीपूजनालाच आपल्या गोमाता असलेल्या लक्ष्मीला मातीआड करण्याची दुर्दैवी वेळ या बळिराजांवर आली आहे. दुसरीकडे मात्र, आपल्या डोळ्यासमोर हे मृत्यू तांडव बघत असताना पशुसंवर्धन विभाग देखील हतबल झाला आहे.

- Advertisement -

तिळापूर या गावात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा प्रमुख आहे. अनेक शेतकर्‍यांकडे गाईंचे मोठमोठे गोठे आहेत. सर्व काही अलबेल असताना या गावाला कुणाची नजर लागली? अन् जनावरांना साथीचा आजार आला. यामधे अनेक गाई, बोकडे, कालवडी, वासरे हे मृत्यूमुखी पडत आहेत. तर अनेकांची जनावरेही गंभीर आजारी देखील आहेत. हे सर्व सुरू असताना पशुसंवर्धन विभाग यांना उशिरा का होईना जाग आली. एकीकडे गाया मृत्यूमुखी पडत असताना त्यांनी गावात जोरदार लसीकरण मोहीम हाती घेतली.

दुसरीकडे मात्र, आजारी गाईंना बरे करण्यासाठी शेतकर्‍यांना लाखो रुपये खर्च येत आहे. तरीदेखील मृत्यू तांडव थांबता थांबेनासे झाल्याने बळिराजाचे पुरते कंबरडे मोडले आहे. हा रोग आटोक्यात आणून शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी अजित पवार, संदीप काकड, जनार्धन काकड, बाबासाहेब काकड, विलास गीते, तात्या तमनर, शंकर बाचकर आदींनी केली आहे. दिवाळीच्या दिवशी तात्या तमनर, नानासाहेब सरोदे गोविद बाचकर, बाबासाहेब गरदरे यांच्या एकूण पाच गाया व एक बोकड मृत्यूमुखी पडले.

मृत्यू नेमका कुठल्या कारणाने होतो? हे अद्याप देखील स्पष्ट झाले नसून शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

– सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त.

तिळापूर गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून साथीच्या आजाराने जनावरांचे मृत्यू होत आहेत. तर अद्याप देखील अनेक जनावरे गंभीर आजारी आहेत. पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी तळ ठोकून असताना देखील गाईंचा मृत्यू रोखण्यात पशुसंवर्धन विभागाची वैद्यकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. दोन दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही आणि शेतकर्‍यांच्या आजारी गाईंना मोफत उपचार झाला नाही तर स्वाभिमानी स्टाईलने तालुका पशुसंवर्धन कार्यालयाला टाळे ठोकून तालुका पशुसंवर्धन अधिकार्‍यास काळे फासण्यात येईल.

– आनंद वने, युवा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या