फादर्स डे विशेष : तात्यांच्या कष्टाचा आम्हाला सार्थ अभिमानच – अनिल पवार

jalgaon-digital
2 Min Read

मनाने हळवे असले तरी कडक शिस्तीचे, अतिशय कष्ट करुन मुलांना उच्च शिक्षण देणारे तात्यांची आठवण आज फादर्स डे निमित्ताने आली आणि आज त्यांच्याविषयी आठवणी जाग्या झाल्या.

आमचे वडील नथ्थु किसन पवार (वय 82) यांना आम्ही भावंड ‘तात्या’ म्हणतो तात्यांचे बालपण त्यांचे आईविना गेले. तसेच ते अतिशय खडतर गेले. त्यामुळे ते मनाने फार हळवे आहेत. हे मला नेहमी जाणवले.

मी घरात मोठा मुलगा त्यामुळे वडिलांनी माझे लाड पण फार केले. लहानपणी मला सैनिकाचा ड्रेस त्यांनी घेऊन दिला त्याचे फोटो आजही सांभाळून ठेवले आहे.

वडिलांनी आजपर्यंत (त्यांचे वय आता 82 वर्ष) सायकल शिवाय कोणतेही वाहन चालविले नाही. माझ्यासाठी लहानपणी सायकलवर बसवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र सिट बनवून घेतले होते. ते कृषी विभागात सेवेत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात मला सायकलवर घेऊन जायचे.

माझ्या शालेय व महाविद्यालयीन काळात त्यांचा कडक शिस्तीचाही अनुभव आहे. ते शाळेत कधी आले नाही परंतु शिक्षकांकडून ते माझ्या शालेय प्रगतीचा नेहमी आढावा घेत असत. आपल्या मुलांना योग्य वळण लागेल याची ते दखल घेत असत. माझ्यासह माझे मित्रही त्यांना घाबरत असत. त्यांची नजर व बोलणेच पुरेसे होत असे. त्यामुळे त्यांनी कधी मला मार दिल्याचे आठवत नाही.

मी माझे पदवी व पदव्युत्तर शिक्षण कृषी विषयात केल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. मला व आम्हा भावंडांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी वैयक्तिक अतिशय कष्ट घेतले.

आजही मला ज्यावेळी गरज भासते त्यावेळी आवर्जून त्यांचा सल्ला घेत असतो. आज ते सेवानिवृत्त आयुष्य अतिशय आनंदाने घालवत आहे. पण आजही माझ्या दर वाढदिवसाला ते त्यांच्या पगारातून मला ड्रेस घेऊन देतात. ती माझ्यासाठी अनमोल भेट असते.

आज या ‘फादर्स डे’ निमित्ताने आवर्जून सर्वासमोर सांगतो ‘तात्या’ मला तुमचा सार्थ अभिमान आहे. ‘आज लव्ह यू तात्या‘ !

– अनिल नथ्थु पवार, उपविभागीय अधिकारी (श्रीरामपूर उपविभाग)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *