Tuesday, April 23, 2024
Homeधुळेकाही पोलीस अधिकारीच बनलेत गुन्हेगारांचे रक्षणकर्ते

काही पोलीस अधिकारीच बनलेत गुन्हेगारांचे रक्षणकर्ते

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्रात केवळ एक सचिन वाझे नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात व शहरात अशा प्रवृत्ती कार्यरत असल्याचे सांगत माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आज प्रसिध्दी पत्रकातून काही नावेच जाहीर केलीत.

- Advertisement -

त्यांच्या या पत्रकाची आणि नावांची सोशल मिडीयावरही चर्चा होते आहे. या पत्रकातून त्यांनी पुन्हा पोलीस प्रशासनावर आरोपांची तोफ डागली आहे.

श्री.गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, आपण जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडीत यांच्याकडे 20 एप्रिल 2020 रोजी लेखी स्वरुपात तक्रार केली असून जिल्ह्यात सुरु असलेल्या गुन्हेगारी घटना, त्यामागचे सुत्रधार आणि त्यास पोलिसांमधील काहींचे पाठबळ याबाबत सविस्तर लिहिले आहे. त्याचप्रमाणे 15 दिवसांपूर्वीही अधीक्षकांना खुले पत्र लिहून अनेक बाबींचा उहापोह केला आहे. असे असतांना पोलीस प्रशासन ढिम्म् बसून आहे.

शिरपूर तालुक्यातील गांजाची शेती आणि आदिवासींकडून वसुल होणारी खंडणी असो की, चोरीच्या वाहनांचा काळाबाजार असो पिस्तुल, रस्तालुट, खून, वा अन्य घटनांमागे पोलिसांमधील काही अधिकारी, कर्मचार्‍यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आपण पुराव्यानिशी वेळोवेळी मांडले आहे.

मुंबईत कांदिवली तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये धुळ्याचा धागा सापडत असल्याचे उघड आहे. दोंडाईचातील माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खोटे गुन्हे दाखल करुन पोलिसांच्याच मदतीने केलेल्या छळाचे प्रकरणही आपण वेळोवेळी मांडले आहे.

असे असतांना नाशिक परिक्षेत्राचे महानिरिक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही हे आपल्याच विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही श्री.गोटे यांनी पत्रकात केला आहे. जिल्ह्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या आणि भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची हकालपट्टी करण्याशिवाय गत्यंतर नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

नावांची चर्चा

काही पोलीस अधीकारी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनून कसे वागत आहेत, कोणते पोलीस अधीकारी व कर्मचारी चोरीची वाहने वापरत आहेत, याचा उल्लेख करतांनाच पोलिसात राहून गुन्हेगारांना सहकार्य करणार्‍या, पाठिशी घालणार्‍या, त्यांच्या चोरीच्या मालाची विल्हेवाट करण्यात मदत करणार्‍या काही जणांवर थेट ठपका ठेवून त्यांची नावेच श्री.गोटे यांनी आज प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात जाहीर केली आहेत. वाझे कोण आपण सांगितले आता परमबिरसिंग कोण हे तुम्हीच शोधा असे आव्हानही श्री.गोटे यांनी केले आहे.

धुळ्यातील वाझे कोण? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. आता श्री.गोटे यांच्या पत्रकातील नावांमुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या