Friday, April 26, 2024
Homeनगरदरमहा पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांची निदर्शने

दरमहा पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांची निदर्शने

पारनेर |प्रतिनिधी|Parner

अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्ती नंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा अतिशय कमी असून त्यातून कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही.

- Advertisement -

त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा पेन्शन मिळावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने पारनेर येथील जुनी पंचायत समितीतील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयावर निदर्शने करून प्रकल्प अधिकारी नारायण कराळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री व महिला बालकल्याण मंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले की, अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. त्यासंबंधीचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव कृती समितीने सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाचा विचार करून शासनाने तातडीने पेन्शन योजना लागू करून कर्मचार्‍यांना मिळणार्‍या वेतनाची निम्मी रक्कम ही दरमहा पेन्शन म्हणून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

परंतु शासन त्यात आश्वासना व्यतिरिक्त कुठलीही कारवाई करत नाही.म्हणून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहेत. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्‍यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मुंबईत जमून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी युनियनचे सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, कॉ. मदिना शेख, संगीता विश्वास, अरुणा खळेकर,अलका नागरे, संगीता इंगळे, अलका रासकर, शोभा साळवे, सुनीता सातपुते, लक्ष्मीबाई जावळे,मीनाक्षी सांगळे, कल्पना चिकने,माया मिसाळ, सुनीता शेवाळे, शारदा घावटे, स्वाती मदने आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या