अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटके आज अर्ज भरणार

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Andheri East Assembly Constituency) शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापलिका प्रशासनावर ताशेरे ओढत त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिल्याने लटके यांच्या उमेदवारीच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऋतुजा लटके आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे येत्या ३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी निश्चित झाल्याने ऋतुजा लटके यांनी मुंबई महापलिकेच्या सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र, ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता.

त्यामुळे ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार असताना तो मंजूर का केला नाही? असा सवाल करत महापालिकेवर ताशेरे ओढले. आज सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब आणि ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना परब यांनी ऋतुजा लटके उद्या, शुक्रवारी अर्ज भरणार असल्याची माहिती दिली. अर्ज भरतेवेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी तसेच राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जोरदारपणे लढण्यास सांगितले. पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना सहानुभूती मिळेल. कारण आमचे आमदार रमेश लटके आम्हाला मध्येच सोडून गेले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत सहानुभूती ही काय असते ते दिसेल, असे अनिल परब म्हणाले.

आम्हाला प्रत्येक टप्प्यावर न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागत आहे. राजकारण खुप खालच्या पातळीवर गेले आहे. आज न्यायालयाने मुंबई महापालिकेला ऋतुजा लटके यांचा राजीनामा का मंजूर केला नाही असा सवाल केला तेव्हा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. वास्तविक अशी खोटी तक्रार १२ ऑक्टोबरला करण्यात आली, अशी माहितीही परब यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *