अन्नसेवा ठरतेय गरजूंना आधार

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार ठप्प झाला असला तरी पोटाची भूक भागवली जाणे अत्यावश्यक आहे.

त्यातच सध्या नगर शहरात अनेक परगावचे रूग्ण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसमोरही पोट भरायचा प्रश्न होतो. अशा सर्वांसाठीच सध्या आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अतिशय मोलाची ठरत आहे. दररोज 500 ते 600 गरजू याठिकाणी येवून सकस, पौष्टिक भोजन पार्सल घेवून जात आहेत. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याच्या दृष्टीने फौंडेशन प्रयत्न करीत आहे.

मनपा कर्मचार्‍यांना मराठा सेवा संघाने दिला मदतीचा हात

या अन्नसेवा केंद्राला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी नुकतीच भेट दिली. ते म्हणाले की, मागील लॉकडाऊनपासून अखंडपणे आनंदधाम फौंडेशन अन्नसेवा देत आहेत. गोरगरीब, गरजू, प्रवास करणारे अशा अनेकांना अतिशय अल्प दरात चांगले पोटभर जेवण मिळण्यासारखा आनंद नाही. नावाप्रमाणेच हे फौंडेशन लोकांना आनंद देण्याचे काम करीत आहे. अशा एकत्रित प्रयत्नातूनच कोरोना महामारीला आपण सगळे जण यशस्वीरित्या तोंड देवू शकतो.

आनंदधाम फौंडेशनने आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. सेवाभाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या मटेरियलपासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन नेमका कधी संपुष्टात येईल हे आताच सांगणे कठिण आहे. अशावेळी आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अनेकांना जगण्याचे बळ देत आहे. आताच्या परिस्थितीत मानवसेवा अतिशय महत्त्वाची असून संकटकाळात प्रत्येक जण फौंडेशनच्या या कार्याला हातभार लावून गरजूंच्या चेहर्यावर पोटभर जेवणाचे समाधान फुलवू शकतो. फौंडेशनच्या या कार्यास मदत करण्याची इच्छा असणार्‍यांनी 9225327988, 9421556502 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *