Friday, May 10, 2024
HomeUncategorized‘धर्मवीर’ने ‘न्याय’ दिला...

‘धर्मवीर’ने ‘न्याय’ दिला…

परिसंवाद-‘दिग्गज’साकारताना

प्रसाद ओक, अभिनेता

- Advertisement -

‘धर्मवीर’ या चित्रपटातील आनंद दिघे यांची भूमिका माझ्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. मध्यंतरीच्या काळात दिग्दर्शनाकडे वळल्यामुळे प्रसादने अभिनय सोडल्याचा इंडस्ट्रीचा समज झाला होता. तो यानिमित्तानं खोडला गेला. दुसरे म्हणजे, स्व. दिघे साहेबांनी जीवंतपणी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. मीही आजवरच्या कारकिर्दीत अनेक पद्धतीच्या भूमिका साकारल्या. त्यांचं प्रेक्षकांकडून कौतुकही झालं. पण मोठं काम हाताला लागत नव्हतं. हा माझ्यावर अन्याय होतोय असं मला वाटत होतं. दिघेसाहेबांनी स्वतः गेल्यानंतरही या चित्रपटाद्वारे माझ्यावरचा अन्याय दूर केला. या भूमिकेचे सर्वदूर कौतुक झाले असले तरी ती करतानाचे आव्हान खूप मोठे होते.

मी आतापर्यंत 90 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. परंतु, चित्रपटाची शीर्षक भूमिका माझ्या वाट्याला काही आली नव्हती. ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ या चित्रपटाने मला ही संधी मिळाली. या चित्रपटाचा निर्माता मंगेश देसाई हा माझा जुना मित्र आहे. त्याने मला एक दिवस अचानक फोन केला आणि मी सध्या काय करतोय याची विचारणा केली. मी मोकळा आहे असे समजल्यानंतर त्याने ठाण्याला एका लूक टेस्टसाठी बोलावले. ठरल्यानुसार ठाण्याला पोहोचलो तेव्हा ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे तेथे होते. त्यांनी माझा मेक सुरू केला; पण मला कोणत्या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करताहेत याचा अंदाज येत नव्हता.

मंगेशनेही काही कल्पना दिली नव्हती. विद्याधर यांनी डोळ्यांखाली खूप काळे लावून रापलेल्या त्वचेचा इफेक्ट दिला. मोठी दाढी-मिशी लावली. मला सुरूवातीला वाटले की एखादा ऐतिहासिक चित्रपट करण्यासाठीची टेस्ट असावी. पण तसेही दिसेना. अखेरीस मी मंगेशला विचारले की, ही कसली लूक टेस्ट करतोय आपण? तो म्हणाला, “ आपण धर्मवीर नावाचा चित्रपट बनवत आहोत.’ मी म्हणालो, ‘धर्मवीर म्हणजे दिघे साहेब का? पण त्यामध्ये माझी लूक टेस्ट कोणत्या पात्रासाठी आहे? तो म्हणाला, ‘दिघे साहेबांच्या !’ ते ऐकून अक्षरशः मी उडालोच ! म्हटलं ‘तू बरा आहेस ना? इतक्या मोठ्या व्यक्तिरेखेसाठी लूक टेस्ट घ्यायला मला इतक्या सहजपणाने बोलावलेस तू ! माझा दिघे साहेबांच्या जीवनाविषयी कसलाही अभ्यास नाहीये. तो म्हणाला, ‘तू टेन्शन घेऊ नको. आत्ता फक्त लुक कसा दिसतोय इतकेच पाहायचेय. ते फायनल झाले तर अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ.

पण सगळ्यात आधी दिसणे महत्त्वाचे आहे. कारण यासाठी अनेक जणांच्या लुक टेस्ट झालेल्या आहेत. तुझे नाव खूप प्रकर्षाने पुढे आले आहे. आम्हाला वाटत नव्हते की तू तसा दिसशील. पण एक प्रयत्न करुन पाहायचा म्हणून तुला बोलावले आहे. हे सर्व ऐकल्यानंतर मी घाबरलेल्या मनाच्या अवस्थेतच ती टेस्ट दिली असल्याने ‘अप टु दी मार्क’ नव्हती. माझ्याकडून नाही पण केसांच्या स्वरुपाबाबत, नाकाबाबत काही समस्या होत्या. दातांच्या ठेवणीचा मुद्दा होता. स्व. दिघे साहेबांचे नाक माझ्यापेक्षा खूप वेगळे होते. लहानपणी पडल्यामुळे माझे नाक थोडेसे वाकडे आहे. दिघे साहेब हसले की त्यांच्या ओठांमधून वरचे दात दिसत. माझे तसे सहसा दिसत नाहीत. याबाबत काय करावे याविषयी आमच्यात चर्चा झाली. विद्याधर भट्टे हे खूप सिनियर रंगभूषाकार असल्यामुळे त्यांनी या अडचणी सहज सोडवल्या. माझ्या दातांचे माप घेतले आणि 4-5 दिवसांनी मला पुन्हा लुक टेस्टला बोलावले. ती लुक टेस्ट अप टू दी मार्क म्हणजे जशी हवी तशी होती.

दिघे साहेबांसोबत अनेक वर्षे घालवणारे शशी जाधव नावाचे व्यक्ती मंगेशचे मित्र आहेत. त्यादिवशी ते मंगेश आणि प्रविणसाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. तर त्या रुममध्ये येत असतानाच मी पूर्ण मेकअप करून बाहेर आलो. मला पाहून त्यांच्या हातातला डबा थरथरायला लागला. त्यांनी तो पटकन ठेवून दिला आणि मला बघून अक्षरशः रडायला लागले. तेवढ्यात मंगेश मागून आला आणि म्हणाला, “शशी काय झाले?” ते म्हणाले, “अरे हे तर दिघे साहेब आहेत.” मंगेश म्हणाला, ‘झालं ! आपल्याला पहिली पावती मिळाली !” गंमत म्हणजे इथे काय चालले आहे हे शशींना माहीत नव्हते. ते दिघे साहेबांचे सच्चे कार्यकतेर्र् होते. त्यांच्याकडूनच अशी प्रतिक्रिया म्हणजे आपण लढाई सुरु केली आहे ती जिंकणार आहोत याची खात्री पटली.

दुसर्‍या टप्प्यात दिघे साहेबांच्या वेषातील माझे व्हिडीओ आणि फोटो शूट करून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघायला पाठवले गेले. शिंदे साहेब मला पाहून भावूक झाले होते. त्यांनी माझे व्हिडीओ आणि फोटो पाहून लागलीच सांगितले की, तुमच्या लुक टेस्ट थांबवा आणि प्रसाद ओकच दिघे साहेब करणार.’ त्यांनी शिक्कामोर्तब केले आणि ‘धर्मवीर’चा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला.

माझ्या मनात त्यावेळी प्रचंड वेगळ्या भावना होत्या. एका कलाकाराला चांगल्या भूमिकेची खूप भूक लागलेली असते. माझ्या बाबत आजवर असे अनेकदा झाले आहे की, तोेंडापर्यंत घास यायचा आणि कुठेतरी माशी शिंकायची आणि घास हिरावून घेतला जायचा. परंतु हा घास खूप पौष्टिक असल्यामुळे तोंडाशी येऊन तो हिरावला जाणे मला परवडले नसते. मला खूप त्रास झाला असता. पण सुदैवाने तसे काही झाले नाही.

स्व. आनंद दिघे यांची भूमिका केल्यापासून माझी जबाबदारी खूपच वाढलेली आहे. कारण मायबाप रसिकांच्या माझ्याकडून असणार्‍या अपेक्षा वाढल्या आहेत. कारण मागची गेली साडे सहा वर्ष माझे स्वत:चे तीन चित्रपट पाठोपाठ आले. 2017 मध्ये ‘कच्चा लिंबू’आला. मी त्याची तयारी 2015 पासून सुरू केली होती. 2019 मध्ये हिरकणी आला आणि यंदाच्या वर्षी ‘चंद्रमुखी’ही आला. या तीनही चित्रपटाच्या दिग्दर्शनात मी सहा-साडे सहा वर्षे पूर्ण अडकल्यामुळे आमच्या इंडस्ट्रीने असा समज करून घेतला की प्रसाद ओक आता दिग्दर्शकच झाला. तो आता अभिनय करत नाही. त्यामुळेच कदाचित या सहा-सात वर्षांत माझ्याकडे अभिनयाबाबतची विचारणाही कमी झाली. पण माझ्याविषयी असणारा हा समज ‘धर्मवीर’ने मोडला गेला. मुळात मी अभिनय करणार नाही, असे कधीच जाहीर केलेले नव्हते. पण इंडस्ट्री स्वत:चे नियम स्वत: ठरवते आणि ते पाळते. परंतु यामुळे माझ्या विषयीचा एक चुकीचा समज पुसला गेला.

‘धर्मवीर’च्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतोय. मदन नावाचा दिघे साहेबांचा एक सहकारी आहे. त्याचे आदल्या दिवशी डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते. डॉक्टरांनी 48 तास घराच्या बाहेर पडायचे नाही, सूर्यप्रकाश डोळ्यावर येऊ द्यायचा नाही अशी ताकीद दिली होती. पण डॉक्टरांचे काहीही न ऐकता मी दिघे साहेबांच्या रुपात कसा दिसतोय हे पाहण्यासाठी हा मदन सेटवर आला होता. ज्या क्षणी मी व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आलो त्यावेळी तो रडायला लागला. खेदाची बाब म्हणजे डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असल्याने या रडण्याचा त्याला खूप त्रास झाला. माझ्या पाया पडण्यासाठी आला आणि चक्कर येऊन तिथेच पडला. पहिला सीन सुरू होण्याआधीची ही प्रतिक्रिया ! एक अभिनेता म्हणून, व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार म्हणून ही प्रतिक्रिया सुखावणारी असली तरी त्याच वेळी ती माझ्या मनावरचं दडपण वाढवणारी होती. नंतर रोजच लोक मला बघायला, भेटायला आणि दिघे साहेबांचे किस्से सांगायला येऊ लागले. असंख्य आठवणी लोक भरभरून सांगायचे. एका माणसाविषयी इतकी माणसे नियमितपणाने इतके भरभरून बोलतायेत हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवले.

सेटवर येणार्‍या सर्वांना एकच उत्सुकता की मी कसा दिसतोय? कारण यापूर्वी मी वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. त्यामुळे माझ्या अभिनयाबाबत लोकांना शंका नसावी. दिघे साहेबांची भूमिका मी उत्तम साकारेन अशी आशा त्यांना नक्कीच होती. पण मी दिसतोय कसा याचे फार अप्रूप लोकांमध्ये होते. शिवसेना नेते शिशिर शिंदे साहेब हे जेव्हा चित्रीकरण स्थळी आले तेव्हा अक्षरशः माझ्याकडे पहातच राहिले. राजन विचारे साहेबांनी तर मला वाकून नमस्कार केला. संजय राऊतांची ‘काय दिसतोयस प्रसाद ! क्षणभर आनंद दिघे साहेब आल्यासारखे वाटले’ ही प्रतिक्रियाही माझा उत्साह वाढवणारी होती.

दिघेसाहेबांची सख्खी बहिण अरुणाताई या चित्रपटाच्या संगीताचं लाँचिंग केले तेव्हा मला भेटल्या. त्यांनी तर मला पाहताक्षणी ‘आनंदऽऽऽ’ अशी हाक मारली आणि जवळ घेत गालावरुन हात फिरवत म्हणाल्या, “माझा आनंद परत आलाय.” एखाद्या अभिनेत्याला त्या भूमिकेसाठी याच्यापेक्षा कुठली चांगली पोचपावती असू शकते! माझ्या आयुष्यातील ही सर्वोच्च पोहोच पावती होती असे म्हणता येईल.

अर्थातच, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही व्यक्तिरेखा साकारणे हे खूप आव्हानात्मक होते. कारण ती व्यक्ती आज हयात नाही, मी त्यांना आजवर कधी प्रत्यक्ष पाहिलेले नाही किंवा भेटलेलोही नाही. अशा व्यक्तीचा संपूर्ण जीवनपट मला साकारायचा होता. त्यांच्याविषयीचे काही साहित्यही उपलब्ध नाही. युट्युबसारख्या माध्यमावर आणि त्यांच्यावर प्रेम करणार्‍या लोकांकडून जे काही तुरळक व्हिडीओ उपलब्ध झाले त्यांची अक्षरशः पारायणे केली. सतत ते व्हिडीओ बघत असे. त्यांचे फोटो खूप उपलब्ध आहेत. तेही मी अनेकदा पाहायचो. त्या फोटोमध्ये दिघे साहेब उभे कसे राहिले आहेत, बसले कसे आहेत, कार्यकर्त्यांबरोबर असताना ते कसे बसायचे, कुत्र्यांशी कसे खेळायचे, त्यांची देहबोली कशी होती, लहान मुलांबरोबर ते कसे बोलायचे, अशा असंख्य बारीकसारीक गोष्टी मी टिपत गेलो आणि अभिनयाच्या माध्यमातून व्यक्तिरेखेत त्या उतरवल्या.

आयपॅडमध्ये असलेल्या दिघे साहेबांच्या फोटोकडे तासन्तास बघत असायचो. खूप बघितल्यावर माझ्या असे लक्षात आले की डोळे म्हणजे त्यांचा आत्मा होता. कारण ते खूप कमी बोलायचे. भाषण तर ते सहसा करतच नसत. कित्येकांनी तर असे सांगितले की, दिघे साहेब काम करत बसले असतील आणि त्यांनी मध्येच मान वर करून पाहिले की कार्यकर्त्यांना साहेबांना चहा हवा आहे, हे लक्षात यायचे. लेखन करत असताना त्यांनी नुसते बघितले की कळायचे यांना फुलस्केप पेपर हवा आहे. थोडक्यात, त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या मनातील सर्व भावना व्यक्त व्हायच्या. इतके बोलके डोळे त्यांचे होते. मग एका क्षणी मला क्लीक झाले की या डोळ्यांची गंमत आपल्याला आली पाहिजे. तेव्हापासून मग मी माझ्या पद्धतीने त्यांच्यासारखे डोळे करण्याचा प्रयत्न करत होतो.

एकदा रात्री दीड वाजता त्यांच्यासारखे डोळे करून बसलो होतो एकटाच. घरातील सगळे झोपले होते. मी सराव म्हणून हे करून बघत होतो. अचानक बेडरुममधून माझा मुलगा तहान लागली म्हणून बाहेर आला. हॉलचा लाईट सुरु असलेला पाहून तो मला बघायला आला. पाहतो तर मी हॉलमध्ये एकटा टक लावून बसलो होतो. त्याला वाटले बाबांना वेड लागले आहे. तो म्हणाला, “ बाबा काय झाले?” कारण तो एकदम घाबरला होता. मी म्हणालो, “अरे काही नाही झाले. मी माझा सराव करत आहे.” तो म्हणाला, ‘ सराव? कसला सराव करताय? तुम्ही तर सोफ्यावर बसला आहात. मी म्हणालो, “मी चेहर्‍याचा व्यायाम करतोय, डोळ्यांचा व्यायाम करतोय.” तो म्हणाला, ‘हो का, दाखव मला काय करतोयस ! मग मी त्याला दिघेसाहेबांसारखे डोळे करुन दाखवले. त्याने टॅबमधला फोटो पाहिला आणि म्हणाला, “अरे बाबा! सेम डोळे दिसतात तुझे त्यांच्यासारखे.” मी म्हणालो, ‘उद्या दाढी-मिशी लावून असे डोळे करून तुला फोटो पाठवतो. तेव्हा तुला काय वाटतेय सांग.’ दुसर्‍या दिवशी आमची फायनल लुक टेस्ट झाली त्याचे फोटो मुलाला पाठवले. तो म्हणाला, “मी दिघे साहेबांचा फोटो नेटवर पाहिला आणि तुझा आत्ताचा फोटो पाहिला, एकदम हुबेहूब दिसतोयस. तु दिघे साहेबांचा रोल कर. चांगला करशील.” अशा अनेक आठवणी आहेत.

चित्रीकरणाला जाताना मनात नेहमी म्हणायचो की दिघे साहेब मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तो आशीर्वाद मला एकाच रुपात द्या. ते म्हणजे तुमचे डोळे मला द्या. असे मी त्यांना हात जोडून म्हणत असे. अन्यथा ही भूमिका पेलता येणे मुश्किल होते. कारण दिघे साहेबांचा आवाका खूप मोठा होता. शुटींगला दिघे साहेबांच्या भूमिकेत मला बघितल्यावर लोक थक्क होत होते. या संपूर्ण चित्रीकरणाच्या काळात म्हणजे जवळपास 55 दिवस मी धीरगंभीर होतो. मजा-मस्ती काहीही केले नाही.

या चित्रपटामध्ये विद्याधर भट्टे काकांनी सगळ्यांचेच गेटअप अत्यंत सुंदर केले. मकरंद पाध्ये नावाचा खूप वर्षापासूनचा माझा एक मित्र आहे. ‘मोरूची मावशी’मध्ये तो काम करायचा.तिथपासूनची आमची मैत्री आहे. पण तो बाळासाहेबांच्या भूमिकेत कसा दिसेल, याचा विचार मधी कधीच केला नव्हता. एकदा मी सेटवर जाऊन बसलो होतो. तो तयार होत होता. पूर्ण मेकअप करुन मकरंद जेव्हा आत आला तेव्हा मी खाडकन उठलो. कारण समोर साक्षात बाळासाहेब ठाकरेच उभे आहेत, असे वाटले. त्यामुळे चित्रपटाच्या यशामध्ये भट्टे काकांच्या जादुई हातांनी घडवून आणलेली किमयाही खूप मोलाची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या