Friday, April 26, 2024
Homeनगरअमृतसागर दूध संघाकडून 5.50 कोटी बँकेत वर्ग

अमृतसागर दूध संघाकडून 5.50 कोटी बँकेत वर्ग

अकोले |प्रतिनिधी| Akole

अमृतसागर दूध संघाकडून दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. 1/- मात्र दूध भाव फरक (रिबेट) देण्यात आले

- Advertisement -

असून संघाचे सर्व कर्मचार्‍यांना सरसकट रु.2000/- मात्र प्रतिमाह पगारवाढ व दिपावाली बोनस 15 टक्के देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये दूधभाव फरक 2.44 कोटी, दूध पेमेंट 2.50 कोटी, कर्मचारी बोनस पगार 35 लाख, व्यापारी देणे 10 लाख असे साडेपाच कोटी रुपये बँकेत वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघाचे चेअरमन, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.

अमृतसागर दूध संघाची संचालक मंडळाची बैठक संघाचे कार्यालयात श्री. पिचड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठलराव चासकर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेनके, प्रविण धुमाळ, रवींद्र हांडे, सौ. नंदा कचरे, रेखा नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

श्री. पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात 21 मार्च 2020 पासून करोनाचे महामारीमूळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. त्याचा परिणाम सर्व व्यावसायावर छोट्या मोठ्या प्रमाणावर झाला परंतु सर्वाधिक फटका दूध उत्पादकांनाच सहन करावा लागला. 32 ते 33 रुपये प्रतिलिटर दूध खरेदीचे दर अचानक कमी होऊन 20 ते 25 रु. पर्यंत खाली आले कारण मार्कटमध्ये सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टारंट, छोटीमोठी चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाच्या मागणीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात घट झाली.

परंतु दूध उत्पादनमध्ये घट न होता सातत्य टिकून राहिले. अशा परिस्थितीत खाजगी दूध भुकटी प्रकल्पधारक देखील दूध स्वीकारण्यास नकार देत असत परिणामी संघास मार्च रोजी नाईलाजास्तव दिवस दूध संकलन बंद ठेवावे लागले. नंतर महाराष्ट्र शासनाने दि. 7/4/2020 पासून दूध खरेदी सुरू केली परंतु शासनाने संघास फक्त 20 हजार लिटर दुधास कोटा दिला व त्यास 26/- रु. दर दिला व संघास दूध संकलनास 25/- रु. दर उत्पादकाना देणं बंधनकारक केले.

त्याच वेळेस संघ उर्वरीत 40 हजार लिटर दूध 22 ते 23 रुपये प्रतिलिटर प्रमाणे विक्री करत होता म्हणजेच संघ 3 ते 4 रुपये प्रतिलिटर तोटा सहन करून उत्पादकांना रु 25/- दर अदा करत होता. अशा परिस्थितीत खाजगी प्रकल्पधारक मात्र दूध उत्पादकाकडून 20 ते 21/- रु प्रतिलिटर प्रमाणे दूध खरेदी करत होते व कमी दरात खरेदी केलेले दूध मार्केटमध्ये संघाच्या खरेदी दरापेक्षाही कमी दराने विक्री करत होते. त्यामुळे संघास देखील विक्री दरामध्ये कपात करावी लागली.

या सर्वांचा परिणाम म्हणून 4 महिन्यांमध्ये (एप्रिल ते जुलै 2020) संघाने 2 ते 2.5 कोटी रुपये उत्पादकांना देऊन तोटा सहन करत शासन नियमाप्रमाणे 25/-रुपये प्रती लिटर दूध खरेदी दर अदा केला आहे. परंतु खाजगी दूध व्यावसायीकांनी मात्र त्यांच्या मनमानीप्रमाणे दूध खरेदी करून उत्पादकांना सरासरी 3 ते 4 रु. प्रति लिटर दर कमी दिलेला आहे. परिणामी संघास लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये 15 ते 20 हजार लिटर दूध संकलनाची वाढ झाली.

संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेत आलेला आहे. यापुढे देखील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. तसेच दूधसंघ दूध उत्पादकांसाठी पशुवैद्यकीय सेवा कमी दरामध्ये उपलब्ध करून देत आहे. तालुक्यामध्ये शासना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकल्पाची पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध नाही किंवा कोणत्याही खाजगी प्रकल्पांची पशुवैद्यकीय सेवा सुविधा तालुक्यात नाही.

याचा देखील उत्पादकांनी विचार करावा. तालुक्यामध्ये 25 ते 30 वर्षांपासून संघ जिल्हा सहकारी बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक, युनियन बँक, एच.डी.एफ.सी बँक तसेच जनलक्ष्मी पतसंस्था व दूधगंगा पतसंस्था यांच्या माध्यमातून दूधाळ गाय खरेदीसाठी व संगोपनासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. दूध निर्मितीचे व उत्पादनाचे काम सातत्याने संघ राबवित आहे. आज देखील जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रती गाय 15 हजार रुपये बँकेच्या नियमानुसार लाभार्थी वाटप चालू आहे.

तसेच किसान क्रेडीट कार्ड माध्यमातून दुधाळ गाय संगोपनासाठी दूध उत्पादकांना आजपर्यंत तालुक्यामध्ये 1 कोटी 58 लाख रुपये मंजूर झालेले असून वाटप चालू आहे. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी सॉर्टेड सिमेन्सचा प्रयोग अल्पावधीतच तालुक्यामध्ये राबविण्याचा मानस आहे. अहवालसालामध्ये संघ आर. के. व्ही. वाय. अंतर्गत 20 टनी दूध भुकटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडळ मिटींगमध्ये घेतलेला आहे.

त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ होणार आहे. तरी दूध उत्पादकांनी संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन विद्यमान चेअरमन माजी आ. पिचड व सर्व संचालक यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या