Friday, April 26, 2024
Homeनगरग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था प्रवेशद्वार क्रमांक तीनमधून करावी

ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था प्रवेशद्वार क्रमांक तीनमधून करावी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डी नगरीत साईसमाधी मंदिराबरोबरच साईबाबांच्या हयातीपासून शिर्डी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेले श्रीगणेशमंदिर, श्रीशिवमंदिर व श्रीशनी मंदिरात ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था प्रवेशद्वार क्रमांक तीनमधून करण्यात यावी, अशी मागणी शिर्डी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत गायके यांनी केली आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे दोनवेळा जगप्रसिद्ध साईमंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता देशात तसेच राज्यात करोनाची लाट ओसरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोव्हिड नियमांचे अटीशर्तीचे पालन करत मंदिरे, धार्मिक तिर्थक्षेत्र स्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली करून दिली आहेत. श्री साईसमाधी मंदिर घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

परंतु असे असले तरी देखील अद्यापही साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक तीन बंदच असल्याने शिर्डी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर, श्री शिवमंदिर आणि श्री शनीमंदीर या तीनही मंदिरांत दर्शनासाठी ग्रामस्थांना मुकावे लागत आहे. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जात आहेत. राज्यातील आघाडी सरकारने साईसंस्थानवर सध्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड केली आहे. त्यामुळे साईसंस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी शिर्डी ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून सदरच्या तिनही मंदिरांत दर्शनासाठी प्रवेशद्वार क्रमांक तीनमधून जाण्यायेण्यासाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करावी,अशी अपेक्षा गायके यांनी व्यक्त केली आहे.

प्रवेशद्वार क्रमांक तीन बंद असल्याने ग्रामस्थांना प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेशमंदिरात दर्शनासाठी मुकावे लागते तर शनी आमवस्येला श्री शनी मंदिरात अशाचप्रकारे सोमवारी महादेव मंदिरात त्यामुळे ग्रामस्थांची मोठी अडचण निर्माण होत आहे. ग्रामदैवत श्री मारुती मंदिराप्रमाणेच साईबाबांच्या काळातील ही तीनही मंदिरे शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी खुले करून द्यावीत, अशी मागणी श्री गायके यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या