Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगस्पंदन : आवाज की दुनिया के दोस्तों...

स्पंदन : आवाज की दुनिया के दोस्तों…

डॉ. प्रवीण घोडेस्वार

१३ फेब्रुवारीला ‘जागतिक रेडिओ दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. काही दशकांपूर्वी रेडिओ हेच माहिती आणि मनोरंजनाचे एक महत्वाचं माध्यम होतं. रेडिओ आणि वर्तमानपत्र ह्या दोन माध्यमांनी अनेक वर्षे लोकांची माहिती नि मनोरंजनाची भूक भागवली. टीव्ही या माध्यमाचे आगमन झाल्यावर रेडिओला काहीसे दुय्यम स्थान प्राप्त झालं.

पण पुढे खाजगी एफ.एम.वाहिन्या आल्यावर रेडिओची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली. मग आपल्या केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरु केलं. आज काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्हा मुख्यालयात आकाशवाणीची एफ.एम. केंद्रे कार्यान्वित आहेत. शिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये खाजगी एफ.एम. केंद्रे देखील सुरु आहेत.

- Advertisement -

एक काळ असा होता की घरात रेडिओ सेट असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं, हे वाचून आजच्या तरुणाईला आश्चर्य वाटेल. पण होता एक काळ असा. साधारणतः सहा-सात दशकांपूर्वीचा. हिंदी-मराठी चित्रपट संगीत-मराठी भावसंगीत-लोकसंगीत-भक्ती संगीत आणि शास्त्रीय संगीत देखील रेडीओमुळेच घराघरांत पोहचलं यात शंका नाही. इतकंच नाही तर टीव्हीचा विस्तार होण्यापूर्वी म्हणजे १९९० पर्यंत क्रिकेट सामन्यांचा आनंद देखील रेडिओवरच्या समालोचनातून चाहत्यांना घेता येत होता. शिवाय २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आजही आकाशवाणी इमाने-इतबारे पार पाडत आहे.

पॉकेट ट्रांझिस्टरचे युग

साधारणतः १९७० ते १९८० या दशकांत रेडिओचा मोठा बोलबाला होता. लोकांना रेडिओच्या किंमती परवडणाऱ्या झाल्याने घराघरात तो ऐकला जाऊ लागला. याचं कारण म्हणजे भल्या मोठ्या आकाराचे, जास्त जागा व्यापणारे, इलेक्ट्रिकवर चालणारे रेडिओ ऐवजी लहान आकाराचे व battery वर चालणारे रेडिओ संच उपलब्ध झाल्याने ते सर्वसामान्य जनता, कष्टकरी वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गीय समूहापर्यंत पोहचले. १९८० नंतर खिशात मावतील एवढ्या आकाराचे पॉकेट ट्रांझिस्टर सुद्धा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे झोपडीत राहणारा असो व बंगल्यात, सर्वांना हे माध्यम सहजप्राप्य झालं. कनिष्ठ वर्गात तर लग्नात सायकलीबरोबरच रेडिओ संच देखील हुंड्यात दिला-घेतला जात होता. मग काही लोकं हुंड्यात मिळालेला रेडिओ संच सायकलीवर अडकवून रुबाबाबत फिरायचे, असं आज सत्तरीत असलेले लोकं सांगतात. त्या काळात आकाशवाणीवरून कार्यक्रम सादर करण्याची संधी सहजासहजी मिळत नव्हती. ज्यांना मिळायची त्यांचे फार अप्रूप लोकांना असायचे. शिवाय ज्यांची (गैर फिल्मी) गाणी ध्वनिमुद्रित होऊन रेडिओवर ऐकवली जायची त्यांना ‘रेडिओ स्टार’ म्हणून ओळखले जायचे.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम

वडील नोकरीनिमित्ताने घराबाहेर असायचे म्हणून आईच्या करमणुकीसाठी वडीलांनी रेडिओ संच घरात आणला होता. म्हणजे माझ्या जन्माआधीच आमच्या घरात रेडिओचं आगमन झालं होतं. साहजिकच लहानपणापासून मला रेडिओ ऐकण्याचा छंद जडला. माझ्या जन्माआधी घेतलेल्या रेडिओ संचाने मी दहावीत जाईपर्यंत मला साथ दिली. पहाटेची भक्ती गीतं, सकाळी-दुपारी-रात्री ऐकवली जाणारी चित्रपट गाणी मी फार आवडीने ऐकायचो. शिवाय रोज संध्याकाळी प्रसारित होणारा ‘युववाणी’ हा कार्यक्रम देखील मला आवडायचा. आम्ही ज्या गावांत राहायचो तिथे जळगाव आकाशवाणी केन्द्र, ऑल इंडिया रेडिओची उर्दू सर्व्हीस, आकाशवाणीचे भोपळ-इंदूर, अहमदाबाद-भरूच केंद्रे ऐकू यायची. शिवाय विविधभारती आणि श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कोर्पोरेशनचा विदेश विभाग (अर्थात रेडिओ सिलोन) वरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येत होता. तसेच तेव्हा इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम देखील दोनदा प्रसारित होत असत. एकदा सकाळी नि पुन्हा प्रसारण दुपारी. हे कार्यक्रम सुद्धा मी आवडीने ऐकायचो. लहान मुलांसाठी तेव्हा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ‘बालदरबार’ हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. इतर आकाशवाणी केंद्रांवरून हा कार्यक्रम महिन्यातून एकदा सहक्षेपित केला जायचा. याच कार्यक्रमातून मी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सहभाग असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या मालिकेचे काही भाग ऐकल्याचे लक्षात आहे.

रेडिओमुळेच अनेक कलावंतांचा झाला परिचय

रेडिओमुळेच हिंदीतल्या सैगल-पंकज मलिक-सी.एच. आत्मा-तलत-हेमंतकुमार-मन्ना डे-रफी- किशोर- मुकेश- नौशाद- सी.रामचंद्र- ओ.पी.- एस.डी.- एल.पी.-आर.डी. यांची ओळख झाली. तर प्रल्हाद शिंदे-शाहीर साबळे-विठ्ठल उमप-सुलोचना चव्हाण-अरुण दाते-राम कदम-सुधीर फडके-यशवंत देव-पी.सावळाराम-वसंत प्रभू-श्रीनिवास खळे-मंगेश पाडगावकर-दादा कोंडके-दत्ता पाटील-हरेंद्र जाधव-रंजना शिंदे-सुमन कल्याणपूर यासारखे मराठी कलावंत परिचित झाले. इतकंच नाही तर बडे गुलाम अली खां, बेगम अख्तर, कुमार गंधर्व-अभिषेकी बुवा-पलुस्कर-गुलाम अली-मेहंदी हसन-वसंतराव देशपांडे-भीमसेन जोशी या सारख्या महान कलावंतांची थोरवी रेडिओमुळेच ज्ञात झाली.

‘आपली आवड’ चे आकर्षण

प्रत्येक आकशवाणी केंद्रावर त्या वेळी श्रोत्यांच्या आवडीची गाणी मराठीत ‘आपली आवड’ मधून तर हिंदीत ‘आपकी फर्माईश/पसंद’ नामक कार्यक्रमातून वाजवली जायची. यासाठी श्रोते पत्र पाठवून आपल्या आवडीचे गाणं कळवायचे. शिवाय पत्र पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं पण सांगितली जायची. विविध भारतीवर पत्रांवर आधारित मनपसंत गाणी ऐकण्याचा कार्यक्रम आता –आता पर्यंत सुरु होता. सध्या पत्रांऐवजी एस.एम.एस. पाठवून श्रोते आपली पसंती कळवतात. कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना मी तीन-चार आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणारा ‘आपली आवड’ कार्यक्रम ऐकायचो. यात ऐकवली जाणारी मराठी युगल गीतं मी त्यांच्या तपशिलासह (चित्रपट, गायक, गीतकार, संगीतकार) नोंदवून ठेवली होती. पुढे या तपशीलावर आधारित एक दीर्घ लेख मी लिहिला होता. तो एका दैनिकाच्या चित्रपटविषयक साप्ताहिक पुरवणीसाठी पाठवला. त्यांनी तो लेख पानभर प्रसिद्ध करूनही अर्धा लेख बाकी राहिला होता. या लेखाचा उत्तरार्ध मात्र प्रसिद्ध न झाल्याने तेव्हा मी फार हिरमुसलो होता.

सरताज गीताची धून

बातम्या-श्रुतिका-लोकनाट्य-रूपक-मुलाखती असे अनेकरंगी श्रवणानंद रेडिओच्या माध्यमातून मी लहानपणी घ्यायचो. शाळेतून घरी आल्यावर सगळ्यात आधी रेडिओचा कान पिळायचा माझा नित्यक्रम होता. असं असलं तरी उशिरात उशिरा रात्री नऊ पर्यंतच रेडिओ ऐकण्याची मुभा होती. ती सुद्धा आठवड्यातून एकदाच. एरवी आठ-साडेआठ नंतर रेडिओ बंद करावा लागायचा. त्या काळातला रेडिओवरचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘सिबाका गीतमाला’ हा नव्या गाण्यांचा कार्यक्रम. (याचे सुरवातीचे नाव ‘बिनाका गीतमाला’ होतं.) दर बुधवारी श्रीलंका केंद्रावरून याचं प्रसारण व्हायचं. हा कार्यक्रम मी फार कान देऊन ऐकायचो. लोकप्रियतेच्या निकषावर क्रमवारी ठरवून यातली गाणी ऐकवली जायची. आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे हा एक count down programme होता. प्रत्येक आठवड्यात १६ गाणी त्यांच्या गुणांच्या क्रमवारीनुसार ऐकवली जायची. कुठलंही गाणं कितीदा ऐकवलं जाईल याचा नियम ठरलेला होता. तेवढ्या वेळा ऐकवून झाल्यावर ते गाणं या कार्यक्रमातून निवृत्त व्हायचं. याला ‘सरताज गीत’ अशी पदवी दिली जायची. हे गाणं ऐकवताना खास तयार केलेली सरताज गीताची धून वाजवली जायची.

‘सर्वश्रेष्ठ गीत’ साठी चढाओढ

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन बुधवारी या कार्यक्रमाचे दोन वार्षिक भाग ऐकवले जायचे. हे कार्यक्रम ‘सालाना प्रोग्राम’ म्हणून प्रसिद्ध होते. दोन्ही भाग मिळून एकूण ३० गाणी त्यांच्या लोकप्रियतेच्या निकषानुसार (म्हणजे त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे ) ऐकवली जायची. कोणतं गाणं ‘सर्वश्रेष्ठ गीत’ ठरेल यासाठी मोठी चढाओढ असायची. लोकांमध्येही याची मोठी उत्सुकता असायची. या कार्यक्रमात गाणं सामील होणं गायक-गीतकार-संगीतकार आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब समजण्यात यायची. गाण्यांना गुणानुक्रम कसा दिला जायचा ? तर ध्वनिमुद्रिकांची विक्री आणि ‘श्रोता संघ’ ( पूर्वी श्रोत्यांचे संघ असायचे. ते आपली मते कळवायचे, असं म्हणतात.) यांचं मत या दोन निकषांवर प्रत्येक गाण्याला गुणदान व्हायचं. वर्षाच्या प्रारंभी गत वर्षाच्या वार्षिक कार्यक्रमात कोणत्या गायक-गायिका, गीतकार-संगीतकार यांची किती गाणी वाजवली गेली याचाही तपशील सांगितला जायचा. मग यातून पहिले, दुसरे…असे गायक-गायिका, गीतकार-संगीतकार घोषित व्हायचे.

‘अमीन सायानी’चा आवाजावर फिदा

बुधवारचा दिवस लहानपणी माझ्यासाठी खास असायचा. मी हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी रात्रीचं जेवण करायचो. एखाद्या दिवशी रात्री आठ पर्यंत घरात जेवण तयार नसेल तर मात्र मी हा कार्यक्रम संपल्यावरच जेवायचो. वर म्हटल्याप्रमाणे खूप कान देऊन मी हा कार्यक्रम ऐकायचो. याला कारण होतं. त्यावेळी रेडिओचं प्रसारण आजच्या इतकं सुस्पष्ट होत नसायचं. वारा-पाऊस-वीजा यामुळे खरखर आवाज यायचा. कधी-कधी असं काही वातावरण नसतानाही आवाज व्यवस्थित येत नसायचा. त्यामुळे हिरमोड व्हायचा, पण इलाज नसायचा. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कार्यक्रम सादर करणाऱ्या निवेदकाचा आवाज आणि शैली! आपल्या अतिशय प्रभावी-उत्फुल्ल आणि जादुई शैलीत श्रोत्यांशी संवाद साधणारे निवेदनातले सुपरस्टार ‘अमीन सायानी’ यांच्या आवाजावर भारतातले नव्हे तर हिंदी भाषा समजू शकणारे आलम दुनियेतले तमाम श्रोते फिदा होते! त्यांच्या आवाजाची नि शैलीची नक्कल करून कित्येक निवेदकांनी आपली कारकीर्द घडवली आहे,याची गणती करायला नको! एवढा त्यांचा प्रभाव होता आणि आजही तो काही प्रमाणात टिकून आहे. तसेच यात ऐकवली जाणारी गाणी इतरत्र फारशी ऐकवली जायची नाहीत. अमिताभ बच्चन ज्या प्रमाणे अभिनयाचा महामेरू आहे तद्वतच अमीन सायानी निवेदनाच्या क्षेत्रातले अनभिषिक्त सम्राट समजले जातात. त्यांनी रेडिओवरून कार्यक्रम कसा सादर करावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. एक वेगळी अशी शैली निर्माण केली आहे. अनेक गावा-शहरांमध्ये कैक जुनिअर अमीन सायानी त्यांनी जन्माला घातले होते. त्यांच्या इतका लोकप्रिय रेडिओ उदघोषक भारतात दुसरा कोणी झालेला नाहीये ! अमीन सायानी म्हणजे रेडिओ निवेदनाचे एव्हरेस्टच! सिबाका गीतमालेत प्रत्येक गाण्याच्या आधी ते गाणं मागच्या आठवड्यात कोणत्या क्रमांकावर (सायानी यांच्या शब्दांत सांगायचं म्हणजे किस पायदान पे…) होतं नि आता कोणत्या क्रमांकावर आहे, हे ते श्रोत्यांना आपल्या दिलखेचक आवाजात सांगायचे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत गाण्याची प्रगती झाली आहे की अधोगती हे ते विशद करायचे.

प्रयोजित कार्यक्रम

मधल्या काळात हा कार्यक्रम टीव्हीवर आला होता. पण यास रेडिओ इतकी लोकप्रियता मिळाली नाही. कशी मिळणार ? शेवटी काळ बदलला ना! एखादा अलौकिक कार्यक्रम अथवा कलाकृती त्या-त्या काळाचे अपत्य असते. कृष्ण-धवल चित्रपट निर्मितीच्या काळापासून सुरु झालेला हा कार्यक्रम नव्वदच्या दशकाच्या अखेरीस थांबला. पण इतकी वर्षे सुरु राहिलेला आणि लोकप्रिय असलेला हा एकमेव कार्यकम असावा. अमीन सयानी देखील एवढी लोकप्रियता मिळवणारे एकमेव उदघोषक असावेत! सिबाका गीतमालेत वाजलेल्या गाण्यांच्या ध्वनीफिती (कॅसेट्स) देखील एच. एम. व्ही. म्युझिक कंपनीने काढल्या होत्या. केवळ सिबाका गीतमालाच नाही तर अमीन सायानी यांचे इतरही काही कार्यक्रम फार लोकप्रिय होते. वानगीदाखल काही नावं मला आठवतात, ती म्हणजे मराठा दरबार अगरबत्ती प्रायोजित कार्यक्रम, एस. कुमार शुटींग- शर्टींग प्रायोजित कार्यक्रम, रिको घड्याळ प्रायोजित कार्यक्रम. हेही कार्यक्रम अमीन सायानी आपल्या अनोख्या अंदाजात पेश करायचे. हे सर्व कार्यक्रम श्रीलंका केंद्रावरून प्रसारित व्हायचे. काही वर्षांपूर्वी सिबाका गीतमाला अर्ध्या तास अवधीची, आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून अमीन सायानी यांनी सादर करायला सुरुवात केली होती. पण फार काळ सुरु राहू शकली नाही. या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले . मात्र ज्या उत्पादनाच्या मालकाकडून (म्हणजे सीबा गायगी प्रायव्हेट लिमिटेड) याची निर्मिती केली जात होती त्यांच्या उत्पादनांचा (टूथपेस्ट व टूथब्रश) खप किती वाढला होता याचा तपशील मला माहिती नाही. सिबाका टूथपेस्ट व ब्रश विक्रीत आघाडीवर आहेत किंवा होते असं कधी ऐकायला आलं नाही. मला वाटतं आता हे उत्पादन बंद झालं असावं.

जयमाला आठवणीतील कार्यक्रम

विविध भारती केंद्रावरून दररोज सायंकाळी प्रसारित होणारा ‘जयमाला’ हा कार्यक्रमही तसा लोकप्रिय होता. मला वाटतं अजूनही हा कार्यक्रम सुरु आहे. यात आपल्या देशाचे सैनिक बांधव आपल्या पसंतीची गाणी ऐकू शकतात. दर रविवारी ‘विशेष जयमाला’ प्रसारित केला जायचा. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतला एखादा कलावंत सैनिक बांधवांशी संवाद साधत त्यांचं मनोरंजन करायचा. लहानपणी रात्री पावणे आठ ते आठ या वेळात याच केंद्रावरून प्रसारित होणारा ‘गीतगंगा’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रमही घरात आवडीने ऐकला जायचा. शिवाय श्रीलंका केंद्रावरून दर मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता मराठी चित्रपटगीतं ऐकवली जायची. तर रोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत ‘आपही के गीत’ हा श्रोत्यांच्या पत्रावर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रमही मला आवडायचा. यात प्रामुख्याने नव्या चित्रपटातली गाणी ऐकवली जायची. या आधी सकाळी साडेसात ते आठ या वेळेत ‘भूले बिसरे गीत’ मध्ये जुनी गाणी वाजवली जायची. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे याची सांगता कुंदनलाल सैगल यांच्या गाण्याने व्हायची. त्या काळात रेडिओ सिलोन हे भारतातले सर्वाधिक लोकप्रिय रेडिओ स्टेशन होतं. याची लोकप्रियता पाहून देशाच्या प्रसारण व नभोवाणी मंत्रालयाने आपल्या देशातही रेडिओची मनोरंजन वाहिनी असावी, असं ठरवलं. याच कल्पनेतून रेडिओ सिलोनला पर्याय म्हणून ‘विविध भारती’ची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येतं. आज विविध भारती देशात सर्वत्र ऐकू येणारे एकमेव लोकप्रिय रेडिओ स्टेशन आहे. विविध भारतीने ‘देश की सुरिली धडकन’ असं सार्थ नाव धारण केलं आहे.

खाजगी एफ.एम. केंद्रे

शिक्षणासाठी मुंबईला आल्यावर आकाशवाणीचं मुंबई- ब केंद्र ऐकण्याची दोन वर्षे संधी मिळाली. पुढे मुंबई -ब चं नामांतर अस्मिता वाहिनी झालं. सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारा ‘कामगारांसाठी’ कार्यक्रम त्याच्या ‘सिग्नेचर ट्यून’ (संकेत धून) मुळे आजही लक्षात आहे. इथं ‘युववाणी’ रात्री साडे नऊ वाजता प्रसारित व्हायचा. यावर येणारा ‘कॉफी हाउस’ हा गप्पांचा कार्यक्रम बहारदारच. होस्टेलमध्ये असताना रात्री अकरा वाजता विविध भारतीवर लागणारा ‘बेला के फूल’ ऐकल्यावरच झोपेच्या स्वाधीन व्हायचो. मी शिकायला मुंबईत असताना १९९२/९३ मध्ये टाइम्स एफ.एम. हे खाजगी केंद्र सुरु झालं होतं. २००० नंतर मात्र आपल्या देशात सर्वत्र खाजगी एफ.एम. केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली.

आकाशवाणीत प्रयत्न

आकाशवाणीत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. १९९३ मध्ये तशी संधी देखील आली होती. सांगली केंद्रावर ‘उदघोषक’ तर अस्मिता वाहिनी साठी ‘वृत्त निवेदक’ या पदासाठी परीक्षा दिली होती. लेखी परीक्षा व स्वर चाचणीत यश संपादन करूनही निवड नाही होऊ शकली. काही वर्षांपूर्वी नाशिक आकाशवाणीने नैमित्तिक करारावर उदघोषक निवड प्रक्रिया पार पडली होती. इथं ही पुन्हा तेच. मुंबई केंद्राचे उदघोषक किशोर सोमण, लता भालेराव, सुषमा हिप्पळगावकर , जळगावच्या उषा शर्मा, नाशिकचे संजय भुजबळ, विविध भारतीचे युनुस खान, रेणू बन्सल, जयंत पाथ्रीकर, निम्मी मिश्रा या सारख्या निवेदकांचा आवाज ऐकणं हा एक वेगळाच आनंद असतो.

‘रेडिओ जॉकी’मुळे स्वरुप बदलले

आजही माझं बऱ्यापैकी रेडिओ ऐकणं होतं. आता तर टीव्ही, मोबाईलवर देखील रेडिओ ऐकण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणतंही केंद्र ऐकता येतं. विविध भारती तर सोशल मिडीयावर वेळोवेळी आपल्या कार्यक्रमांची जाहिरात करत असते. आता उदघोषक ऐवजी आर.जे. अर्थात ‘रेडिओ जॉकी’ असं नामकरण निवेदकाचं झालं आहे. रेडिओवर बोलणं म्हणजे जोर-जोरात बडबड करणं असं काहीसं झालं आहे. तसेच तीच-तीच गाणी खाजगी एफ.एम. केंद्रांवर ऐकवली जातात. गाण्याचा कर्त्यांचा (गायक-गीतकार-संगीतकार) तपशील क्वचितच सांगितला जातो. चालायचंच. काळाचा महिमा. साधारणतः एक दशकापूर्वी स्पेस रेडिओ केंद्र सुरु झालं होतं. यावर मराठी आणि हिंदी, दोन्ही भाषेतली गाणी ऐकवली जायची. पण हाही प्रयोग अल्पजीवी ठरला. याच सुमारास श्रीलंका आकाशवाणी केंद्राचा विदेश विभाग आणि यातली हिंदी सर्व्हीस बंद पडली. ही सुरु राहावी यासाठी लता-आशा भगिनींनी आर्थिक सहाय्य करावं असं मत काही जाणकारांनी मांडलं होतं. कारण यांची गाणी लोकप्रिय करण्यात या केंद्राने फार मोठी भूमिका बजावली आहे. मात्र या दोन्ही गायिकांनी यात लक्ष घातल्याचं आढळून आलं नाही.

आकाशवाणीकडे खजीना

आज आकाशवाणीकडे अनेक दिग्गज शास्त्रीय गायकांचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. खरं म्हणजे खजिनाच म्हणायला हवा. प्रसार भारतीने यातलं काही ध्वनीमुद्रण विक्रीला पण ठेवलं आहे. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक रथी-महारथी यांच्या आवाजातलं मौलिक ध्वनिमुद्रण विविध भारतीकडे संग्रही आहे. हे ते वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहचवत असतात. नुकतेच दिवंगत झालेले अभिनेते राजीव कपूर यांची मुलाखत त्यांनी ऐकवली होती. मनोरंजन-माहिती-प्रबोधन-लोकशिक्षण याचा वसा घेतलेल्या आकाशवाणीने रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांची केलेली सेवा अमूल्य अशीच आहे. आजही या सेवेत खंड पडलेला नाहीये. मुंबईत आलेल्या पुराच्या वेळी रेडिओने फार मोलाची भूमिका केली होती. तसेच कोविड काळातही रेडिओने उल्लेखनीय कार्य केलं असल्याचं पुढे आलं आहे. श्राव्य माध्यमाचं अतिशय परिणामकारक नि प्रभावी साधन म्हणजे रेडिओ. अलीकडेच या विषयवार ‘रेडू’ नामक अतिशय चांगला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘रेडिओ’ नावाचं साधन कधीच कालबाह्य होईल असं वाटत नाही. हा लेख देखील मी रेडिओ ऐकता-ऐकताच लिहिलाय. अमीन सायानी यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, ‘’बहनो और भाईयो, दोस्तो रेडिओ सुनते रहिये..खुश रहो..मिलते है अगले हफ्ते..तबतक खुदा हाफिज !’’

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या