Saturday, April 27, 2024
Homeनगरमनपाचे कामकाज आजपासून सुरू

मनपाचे कामकाज आजपासून सुरू

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुुळे महापालिका प्रशासन आजपासून (बुधवार) कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच महापालिकेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

करोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिका कार्यालयातील कामकाज तीन दिवसांपासून बंद होते. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करा तरच कामावर हजर होऊ अशी भूमिका कामगार युनियन घेतली होती. काल याबाबत बैठक झाली. आयुक्त श्रीकांत मायकलवार, महापौर बाबासाहेब वाकळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपाध्यक्ष अय्युब शेख, अकील सय्यद उपस्थित होते.

सर्व कामगारांची करोना विषयक वैद्यकीय तपासणी करावी, त्यांना सुरक्षा साधने द्यावीत, नवीन प्रशासकीय इमारतीत नागरिकांचा प्रवेश बंद करावा, आदी मागण्या युनियन तर्फे अध्यक्ष लोखंडे यांनी केल्या. कामगारांच्या या भूमिकेचे प्रशासकीय पातळीवर समर्थन करण्यात आले.

बैठकीत महापालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत अतिशय महत्त्वाचे काम असणार्‍याच नागरिकांना प्रवेश देण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कर्मचार्‍यांनी सकाळी कामावर यावे.

त्यांच्या कामाच्या जागेवर महापालिकेचे वैद्यकीय पथक येईल. हे पथक तपासणी, पल्स व ऑक्सिजन काउंट तसेच थर्मल स्कॅनिंग करेल. प्राथमिक तपासणी शंकास्पद वाटल्यास त्याची करोना चाचणी केली जाईल, असे यावेळी ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या