Friday, April 26, 2024
Homeनगरमनपा कर्मचारी युनियनचे 10 डिसेंबरपासून धरणे आंदोलन

मनपा कर्मचारी युनियनचे 10 डिसेंबरपासून धरणे आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीतील 12 कोटीची रक्कम बेकायदेशीरपणे खर्च केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

ही रक्कम तातडीने निधीमध्ये एक रक्कमी जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी युनियनने 10 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

युनियने अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात करण्यात येणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम निधीमध्ये जमा केली जात नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून आहेत. आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे कपातीची रक्कम निधीमध्ये जमा करण्याऐवजी इतरत्र वापरली जात होती.

नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2017 पर्यंतची ही 12 कोटींची रक्कम आहे. ती निधीमध्ये एक रकमी जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी अदा करावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेंतर्गत कर्मचार्यांची थकित बिले द्यावीत, पात्र कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नतीचा फरक एक रकमी अदा करावा.

पाचव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी अदा करण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, हद्दवाढीतील कर्मचार्‍यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पाचव्या वेतन आयोगाचा फरक द्यावा, वेतनातून व्यवसाय कराची जादा केलेली कपातीची रक्कम अदा करावी, कोविड अंतर्गत सेवेत असताना मयत झालेल्या चार कर्मचार्‍यांच्या वारसांना सुरक्षा कवच विमा योजनेंतर्गत लाभ मिळावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मागण्यांसाठी युनियनसमवेत तातडीने संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी केलेली होती. मात्र अद्याप या मागणीस प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी 10 डिसेंबरपासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युनियनने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या