Friday, April 26, 2024
Homeनगरम्हसवंडी, आंबी दुमालात चोरट्यांचा धुमाकूळ

म्हसवंडी, आंबी दुमालात चोरट्यांचा धुमाकूळ

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील म्हसवंडी व आंबी-दुमाला गावात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (14 डिसेंबर) पहाटे एक ते पाच वाजण्याच्या सुमारास धुमाकूळ घातला. म्हसवंडी येथील सात बंद घरे तर आंबी दुमाला येथील एक घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. एकाच रात्री मोठ्या प्रमाणात झालेल्या घरफोडीमुळे पठार भागातील ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

- Advertisement -

म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, रवींद्र उध्दव इथापे, बळीराम कारभारी बोडके, गुलाब गोविंद बोडके, अशोक कारभारी बोडके, बाळासाहेब कारभारी बोडके या सर्वांची घरे फोडून मोठा ऐवज चोरून पोबारा केला. त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी आंबीदुमाला येथील सुमन रंगनाथ जाधव यांचेही घर फोडून दागिने चोरून पोबारा केला. सर्वच ठिकाणी बंद असलेल्या घरांच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अनेक घरांत प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त केले. यातील बरेच लोक नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात.

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस आधिकारी राहूल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांनी फोडलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी घरातील सामानांची उचकापाचक करत कपडे फेकून दिले होते. त्यानंतर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

दरम्यान शांताराम रामू बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 285 / 2021 भादंवि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत करत आहेत. थंडीचा वाढलेला कडाका यामुळे रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना बंद घरे हेरून चोर्‍या करण्यात आल्या आहेत. घारगाव पोलिसांनी चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेत रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या